“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 19:36 IST2024-11-13T19:36:01+5:302024-11-13T19:36:21+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: हे धर्मयुद्ध असल्याचे सांगून भाजपावाले दिशाभूल करीत आहे. असे युद्ध रोजगारासाठी , शेतकऱ्यांसाठी लढणार का, असा सवाल कन्हैया कुमार यांनी केला.

“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्राला थोर संतांचा वीरांचा वारसा लाभला आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दोन पक्ष फोडून सरकार बनवण्यात आले. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुलाखतीत सांगितले की सरकार पाडण्याच्या बैठकीत अदानी उपस्थित होते. महाराष्ट्राचे शक्तीकेंद्र गुजरातच्या व्यापाराच्या हातात गेले. महाराष्ट्रातील प्रकल्प, जमिनी गुजरातच्या व्यापाऱ्याच्या घशात घालण्यात आले. महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का लागला आहे. महाराष्ट्राची ही निवडणूक तो स्वाभिमान परत मिळवण्यासाठी आहे अशी टीका काँग्रेसचे स्टार प्रचारक कन्हैय्या कुमार यांनी केली.
आरमोरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांच्या प्रचारार्थ विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपावाले हे धर्मयुद्ध असल्याचे सांगून दिशाभूल करीत आहे. हे धर्मयुद्ध असेल तर आम्ही पण सोबत आहोत. पण हे युद्ध रोजगारासाठी , शेतकऱ्यांसाठी लढणार का, असा सवाल कन्हैया कुमार यांनी उपस्थित केला.
तरुणांच्या हातून काम हिरावणाऱ्या महायुतीला सत्तेतून बेदखल करा
पंतप्रधान मोदी हे जुमलेवादांचे सरदार आहे. ते सांगतात आपण तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालोत. मात्र वास्तव्यात येथील 80 कोटी जनता आजही पाच किलो मोफत धान्याच्या रांगेत उभी आहे. सत्तेच्या अहंकारात भाजप सरकार हे उद्योगपती अदानीचे हित जोपासत आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम राबविला असून उद्योग पळविणाऱ्या तरुणांच्या हातून काम हिरावणाऱ्या महायुतीला सत्तेतून बेदखल करा असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, निवडणुकीत भाजप अडचणीत आली की त्यांना धर्म आठवतो. धर्मांधतेच्या नावावर विष पेरून समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व गुजरातच्या चरणी महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवणाऱ्या धडा शिकवा असा प्रहार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच महाराष्ट्रातील लुटारू, असंवैधानिक सरकारने जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. महाविकास आघाडी ही राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्ज माफ, महिला भगिनींना प्रतिमाह ३ हजार रुपये, सुशिक्षित बेरोजगारांना ४ हजार रुपये प्रतिमाह बेरोजगार भत्ता, महिलांना मोफत एसटी प्रवास व विविध विकास योजना कार्यान्वित करणार आहोत, असे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.