सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 17:53 IST2024-11-04T17:42:34+5:302024-11-04T17:53:27+5:30
MadhurimaRaje News Kolhapur: सतेज पाटलांना हा मोठा धक्का मानला जात असून ते चांगलेच भडकलेले दिसले आहेत. अशातच सतेज पाटील भडकण्यापूर्वी निवडणूक अधिकारी कार्यालयात मोठे नाट्य घडल्याचे पहायला मिळाले आहे.

सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
कोल्हापूरमध्ये काँग्रेसने दिलेला आधीच उमेदवार नको म्हणून उमेदवार बदलण्यात आला होता. याच उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्याने मविआत मोठी खळबळ उडाली आहे. सतेज पाटलांना हा मोठा धक्का मानला जात असून ते चांगलेच भडकलेले दिसले आहेत. अशातच सतेज पाटील भडकण्यापूर्वी निवडणूक अधिकारी कार्यालयात मोठे नाट्य घडल्याचे पहायला मिळाले आहे.
निवडणूक अधिकारी कार्यलयात येताना खासदार शाहू महाराज हे भडकलेले दिसत होते. आवारात प्रवेश करताच ते एका व्यक्तीवर चांगलेच डाफरले. यानंतर पुढे येत ते मधुरिमाराजे व मालोजीराजे असलेल्या दालनात गेले. त्यांच्या मागोमाग सतेज पाटीलही होते. आतमध्ये सतेज पाटील दिसले नाहीत म्हणून शाहू महाराज त्यांना शोधण्यासाठी पुन्हा बाहेर आले. आतमध्ये असल्याचे समजताच शाहू महाराज पुन्हा आत जाताच दालनाचा दरवाजा लावण्यात आला. यावेळी शाहू महाराजांनी मधुरिमाराजे यांच्यावर सही करण्यासाठी दबाव टाकला. यांच्या समोर सही करा, असा आदेश शाहू महाराज यांनी दिला.
यामुळे या दालनातून मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंच्या हाताला धरून बाहेर नेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे सही करण्यासाठी नेले. शाहू महाराजांनी बाहेर येऊन प्रसारमाध्यमांना जुजबी उत्तरे दिली. अपक्ष उमेदवार राजू लाटकर यांनी उमेदवारी मागे न घेतल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे शाहू महाराजांनी स्पष्ट केले. परंतू, एकंदरीत व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून वेगवेगळे तर्क वितर्क लढविण्यास सुरुवात झाली आहे.
सतेज पाटलांनीही नाराजी व्यक्त केली आहे. लढायचे नव्हते तर आधीच सांगायचे होते, मला कशाला तोंडघशी पाडले अशा शब्दांत त्यांनी शाहू महाराजांना विचारणा केली आहे. माझी फसवणूक केली, हे काही बरोबर झाले नाही, असेही सतेज पाटील म्हणाले आहेत. ज्या लोकांनी आग लावण्याचे काम केले त्यांना सोडणार नाही असा दमही सतेज पाटलांनी दिला आहे. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर येत सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.