शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 17:32 IST2024-11-27T17:31:44+5:302024-11-27T17:32:43+5:30
Maharashtra New CM: गरज सरो वैद्य मरो, हा अजेंडा भाजपने वापरू नये. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती. तर आज चित्र वेगळे राहिले असते.

शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद द्यायचे की भाजपाचा मुख्यमंत्री करायचा यावरून महायुतीचे काही ठरत नाहीय. शिंदे गटाने मुख्यमंत्री पदाबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे महायुतीच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा चार दिवस झाले तरी होत नाही. अशातच शिंदेंनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे वरिष्ठ ठरवतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल असे कबूल केले आहे. यावर शिंदेंसोबत महायुतीत येताना मविआचे मंत्रिपद सोडून आलेले बच्चू कडूंचे वक्तव्य आले आहे.
गरज सरो वैद्य मरो, हा अजेंडा भाजपने वापरू नये. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती. तर आज चित्र वेगळे राहिले असते. म्हणून आज ही जी किमया झाली आहे ती एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे आली आहे. भाजप असे करेल वाटत नाही. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची दावेदारी एकदम योग्य आहे असे बच्चू कडू म्हणाले.
याचबरोबर त्यांनी सत्तेसोबत रहायचे की नाही हे २ डिसेंबरच्या शेगाव येथील अधिवेशनात ठरविणार असल्याचे स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांचा फतवा व हिंदूंचे बटेंगे तो कटेंगे या सर्व धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हरला असल्याची प्रतिक्रिया प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख कडू यांनी दिली. मतदार संघात प्रचंड काम केले. 6 हजार 700 कोटींची विकास कामे केली आणि मते मिळाली 67 हजार, सेवा हरली राजकारण जिंकले, असे कडू यांनी सांगितले.
धार्मिकता, लाडक्या बहिणींचा प्रभाव आणि ईव्हीएम मधील घोटाळा ही पराभवाची प्रमुख कारणे आहेत, असेही कडू म्हणाले. 29 डिसेंबरला मुंबई येथे सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक आहे, त्यानंतर शेगावची बैठक, त्यात पुढील दिशा ठरवू, असेही कडू यांनी स्पष्ट केले आहे.