"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 18:14 IST2024-11-19T18:13:28+5:302024-11-19T18:14:32+5:30
Vinod Tawade vs Rahul Gandhi, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पैसे वाटपाच्या आरोपावरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता

"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
Vinod Tawade vs Rahul Gandhi, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक आहे. महाराष्ट्रात उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यादरम्यान आज विरारमधील हॉटेल विवांतामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आले असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. तर या हॉटेलमधून १० लाखांची रोख मिळाली असून अनेक डायऱ्याही सापडल्या अन् त्यात व्यवहाराच्या नोंदी असल्याचा दावा स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला. या साऱ्या गोंधळात राहुल गांधी यांनी तावडे प्रकरणावरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्याला विनोद तावडे यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
राहुल गांधींचे ट्विट काय?
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना महाराष्ट्रातील एका हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडण्यात आले आहे. विनोद तावडे हे एका पिशवीत पैसे घेऊन तेथील लोकांना बोलावून पैसे वाटून घेत होते. ही बातमी समजताच मोठा गोंधळ उडाला. विनोद तावडेंचे या संदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. या गोंधळावर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेली पोस्ट शेअर केली आणि सवाल केले. 'मोदीजी, हे ५ कोटी रुपये कोणाच्या सेफमधून बाहेर आले? जनतेचे पैसे लुटून तुम्हाला टेम्पोमध्ये कोणी पाठवले?' असा थेट सवाल राहुल गांधी यांनी केला. 'महाराष्ट्रात मतदान होण्याआधीच भाजपाचे नेते पैशाच्या जोरावर निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यात कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन कठोर कारवाई करावी', अशी पोस्ट काँग्रेसने केली. तीच पोस्ट राहुल गांधी यांनी त्यांच्या हँडलवर शेअर केली.
मोदी जी, यह 5 करोड़ किसके SAFE से निकला है? जनता का पैसा लूटकर आपको किसने Tempo में भेजा? https://t.co/Dl1CzndVvl
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 19, 2024
विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर
विनोद तावडे यांनी राहुल गांधी यांच्या ट्विटरपोस्ट वर उत्तर दिले. 'राहुल गांधी जी, तुम्ही स्वत: नालासोपारा येथे या, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, येथे निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईचा आढावा घ्या आणि मग सिद्ध करा की इथे तुम्ही म्हणताय तशा प्रकारे पैसे आले आहेत. कुठल्याही गोष्टीची पूर्ण माहिती न घेता अशा प्रकारचे विधान करणे हा पोरकटपणा नाही तर दुसरं काय आहे,' अशा शब्दांत विनोद तावडे यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले.
. @RahulGandhi जी, आप स्वयं नालासोपारा आएँ, होटल का सीसीटीवी फुटेज देखें, वहाँ हुई निर्वाचन आयोग की पूरी कार्यवाही देखें और यह साबित करें कि इस प्रकार पैसा आया।
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 19, 2024
बिना किसी जानकारी के इस प्रकार का वक्तव्य बचपना नहीं तो और क्या है! https://t.co/KOgj6vQqJY
दरम्यान, या संदर्भात निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तावडे यांच्यासह भाजपा उमेदवार राजन नाईक यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.