आज तिघांचाच शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार कधी? भरत गोगावलेंनी सांगितली ही तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:17 IST2024-12-05T12:12:20+5:302024-12-05T12:17:01+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Result: आज मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह केवळ दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होईल, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन होत असलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबतची उत्सुकता इच्छुक नेत्यांमध्ये आहे.

आज तिघांचाच शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार कधी? भरत गोगावलेंनी सांगितली ही तारीख
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास पंधरवडा उलटत आल्यावर अखेर आज राज्यात स्पष्ट बहुमत मिळवलेल्या महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह केवळ दोन उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी होईल, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन होत असलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबतची उत्सुकता इच्छुक नेत्यांमध्ये आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटातील प्रमुख नेते आणि ज्येष्ठ आमदार भरत गोगावले यांनी ११ डिसेंबर रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असा दावा केला आहे.
आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेबाबत हा दावा केला आहे. ते म्हणाले की, इतर मंत्र्यांच्या शपथविधीबाबत आम्हाला तशी काही कल्पना देण्यात आलेली नाही. परंतु आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. बाकीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी हा ११ डिसेबर रोजी होईल, असं आम्हाला वाटतं. कारण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला वेळ फार कमी आहे. त्यावेळेत एवढ्या लोकांचा शपथविधी उरकणार नाही. त्यामुळे आज तिघांचाच शपथविधी होईल, उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी हा ११ तारखेला होईल.
तसेच महायुतीमध्ये खातेवाटपावरून झालेल्या मतभेदांबाबत भरत गोगावले म्हणाले की, खातेवाटपाबाबत जो काही तिढा आहे तो सोडवला जाईल आणि प्रत्येकाला योग्य ती खाती दिली जातील. एकनाथ शिंदे यांनी मागितलेल्या खात्यांवर विचारविनिमय सुरू आहे. कदाचित आज दुपारपर्यंत सारं काही स्पष्ट होईल.
दरम्यान २३ नोव्हेंबर रोजी लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं होतं. त्यात भाजपाला १३२, शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४१ जागा अशा मिळून महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला होता. तर काही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचं संख्याबळ हे २३५ च्या वर पोहोचलं आहे.