भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 15:21 IST2024-11-15T15:10:49+5:302024-11-15T15:21:21+5:30
ज्यांच्या हातात आपण महाराष्ट्राची सत्ता दिली त्यांचा ५ वर्षाचा अनुभव बघितला तर सत्तेत बदल केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही असं पवारांनी म्हटलं.

भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
इचलकरंजी - महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. यातच राजकीय सभांचा धुरळा उडला आहे. शरद पवारांची आज इचलकरंजी येथे जाहीर सभा होती. मात्र या सभेवेळी पाऊस सुरू झाला तेव्हा महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. माझा, जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध नाही. परंतु पावसाच्या सभेत मी बोलल्यामुळे निकाल चांगला लागेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
इचलकरंजी इथल्या सभेत शरद पवार म्हणाले की,महाराष्ट्रात मी सभेला बोलायला उभा राहिलो तर की पावसाची सुरुवात होते. त्यात मी बोलल्यानंतर निवडणुकीचा निकाल हा चांगला लागतो. मध्यंतरी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा याचा निकाल आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे. ज्यांच्या हातात आपण महाराष्ट्राची सत्ता दिली त्यांचा ५ वर्षाचा अनुभव बघितला तर सत्तेत बदल केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सत्तेत बदल करायचा असेल महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी करून सरकार बनवण्याचं ऐतिहासिक काम उद्याच्या २० तारखेला तुम्हाला घ्यायचे आहे. भरपावसात तुम्ही याठिकाणी आलात, आमची भूमिका समजून घेण्याची तयारी केली त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो असं त्यांनी जनतेला सांगितले. पावसामुळे १० मिनिटांत ही सभा उरकण्यात आली.
शरद पवार यांचा पावसात भिजताना भाषण देतानाचा फोटो आजही अनेकांच्या लक्षात आहे. साताऱ्यातील त्या सभेचं सर्वत्र कौतुक झाले. पायाला दुखापत होऊनही पवारांनी दाखवलेल्या जिद्दीचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात आले. सोशल मीडियात शरद पवारांचा फोटो ट्विटरवर ट्रेंडमध्ये आला. पावसाची संततधार सुरू असूनही शरद पवार भाषण देण्याचे थांबले नव्हते. शरद पवार भर पावसात आणि पायाला दुखापत होऊनही सभा घेत असल्याचं पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. त्यांच्या प्रत्येक वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. तसेच काही इचलकरंजी येथे घडले. सभास्थळी पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यावेळी पवार भाषणाला उभे राहिले. त्यांनी पाऊस आणि भाषण यांच्या योगायोगावरून विनोदी शैलीत भाष्य केले.