आमची मुस्लीम मते कमी करण्यासाठी...; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:33 IST2024-11-12T16:30:52+5:302024-11-12T16:33:19+5:30
मागील वेळीही एमआयएमचा वापर संजय शिरसाटांनी स्वत:ची जागा वाचवण्यासाठी केला होता असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.

आमची मुस्लीम मते कमी करण्यासाठी...; अंबादास दानवेंचा शिंदे-फडणवीसांवर आरोप
छत्रपती संभाजीनगर - MIM ही संघटना देश विघातक विचारांची आहे. धर्मवाद पसरवणारी आहे. त्यामुळे त्यांच्या करणी आणि कथनीत फरक आहे. एमआयएम पक्ष भाजपासाठी काम करतो. मुस्लीम मते आम्हाला मिळतायेत. त्यामुळे ही मते कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडून एमआयएमचा वापर केला जात आहे असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुस्लीम समाजाला आवाहन केले आहे.
पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, रझाकार विचारांची एमआयएम संघटना आहे. त्यामुळे सर्वांना, मुस्लिमांनाही आवाहन करेल. एमआयएमकडे जावू नका. त्यांच्याकडे जाऊन काही होणार नाही. ते महाराष्ट्रात मोजक्या १०-१२ जागा लढतेय त्यामुळे त्यांचे निवडून येऊन सरकार बनणार नाही म्हणून एमआयएमला मतदान करू नका असं दानवेंनी म्हटलं.
तसेच संजय शिरसाट यांनी राजू शिंदे यांच्यावर आरोप करताना एमआयएम अशी भूमिका मांडली. एमआयएम ही भाजपा आणि एकनात शिंदे यांना मदत करणारी संघटना आहे. राज्यात ५ वर्ष एमआयएमचे २ आमदार होते, त्यांनी मागील अडीच वर्षात सातत्याने शिंदे यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. परिणामी त्यांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणि इतर लाभ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी पोहचवला आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.
दरम्यान, मागील वेळीही एमआयएमचा वापर संजय शिरसाटांनी स्वत:ची जागा वाचवण्यासाठी केला होता. यावेळीही तसेच होत आहे. कारण मुस्लीम मतदान मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी आणि शिवसेनेलाही होत आहे. तसा कल दिसून येतो. हे मुस्लीम मते आम्हाला न मिळता ते MIM ला जावे असा प्रयत्न संजय शिरसाट, भाजपा आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष करतोय. MIM ही शिंदे भाजपाची बी टीम आहे हे जनतेला वाटतं असंही अंबादास दानवेंनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या जिल्ह्यात तीन सभा
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे आ.दानवे यांनी सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता कन्नड येथे तर १५ रोजी सकाळी ११ वाजता सिल्लोड येथे सभेचे आयेाजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.