युती अन् आघाडीला धक्का! सांगलीत विशाल पाटील अपक्ष; सोलापुरात वंचितने घेतली माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 07:02 AM2024-04-23T07:02:35+5:302024-04-23T07:03:31+5:30

राज्यातील ११ मतदारसंघांतील लढती स्पष्ट, उस्मानाबाद मतदारसंघात शेवटच्या दिवशी चौघांनी उमेदवारी मागे घेतली

Loksabha Election 2024 - In Sangli Vishal Patil Independent; Application of Vanchit Bahujan Aghadi candidate in Solapur withdrawn | युती अन् आघाडीला धक्का! सांगलीत विशाल पाटील अपक्ष; सोलापुरात वंचितने घेतली माघार

युती अन् आघाडीला धक्का! सांगलीत विशाल पाटील अपक्ष; सोलापुरात वंचितने घेतली माघार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघांंच्या लढतींचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले असून एकूण २५८ उमेदवार रिंगणात आहेत. सांगली मतदारसंघात विशाल पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली असून ते अपक्ष लढणार असल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. सोलापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.

सांगलीत महाविकास आघाडीने उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील यांना तर भाजपने खा. संजय (काका) पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा आपल्याकडे घ्या आणि विशाल पाटील यांना उमेदवारी द्या, असा आग्रह काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी धरला होता पण तो मान्य झाला नाही म्हणून पाटील यांनी अपक्ष अर्ज भरला. आज शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेतली नाही. 

सोलापुरात शिंदे-सातपुते यांच्यात थेट लढत
२०१९ च्या निवडणुकीत सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर लढले होते आणि त्यांनी १ लाख ७० हजार मते घेतली होती. भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांचा १,५८,६०८ मतांनी विजय झाला होता. यावेळी वंचित मोठ्या प्रमाणात मतविभाजन करणार असे बोलले जात असतानाच राहुल गायकवाड यांनी माघार घेतली. 

या ठिकाणी भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अशी मुख्य लढत रंगेल. एमआयएमने उमेदवार दिला नसून ‘संविधान संरक्षणाचे काम करू शकेल अशा उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा’असे आवाहन केले आहे. 

उस्मानाबादेत तिरंगी लढत
उस्मानाबाद मतदारसंघात शेवटच्या दिवशी चौघांनी उमेदवारी मागे घेतली. यामुळे आता महाविकास आघाडी, महायुती अन् वंचित बहुजन आघाडीत तिरंगी सामना रंगणार आहे. आता ३१ उमेदवार लढतीत राहिले आहेत. मविआचे ओमप्रकाश राजे निंबाळकर व महायुतीच्याअर्चना पाटील यांच्यात  चुरस आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकरांना मिळणारी मते या निवडणुकीत जय-पराजयाचे कारण ठरण्याची शक्यता असल्याने लढतीला तिरंगी स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वेतिहास पाहता पाटील-राजेनिंबाळकर कुटुंबात नेहमीच चुरशीची लढत होत आली आहे. यावेळी दीर-भावजयीत सामना होत आहे.
 

Web Title: Loksabha Election 2024 - In Sangli Vishal Patil Independent; Application of Vanchit Bahujan Aghadi candidate in Solapur withdrawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.