Lok Sabha Election Results 2019 ncp supriya sules emotional tweet | लोकसभा निवडणूक निकाल 2019 : 'श्रमलेल्या बापाची बुलंद कहाणी'; सुप्रिया सुळेंची कवितेतून शरद पवारांना 'सलामी'
लोकसभा निवडणूक निकाल 2019 : 'श्रमलेल्या बापाची बुलंद कहाणी'; सुप्रिया सुळेंची कवितेतून शरद पवारांना 'सलामी'

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची गणना राज्यातील प्रमुख लढतींमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी भाजपा उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला आहे.लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची गणना राज्यातील प्रमुख लढतींमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी भाजपा उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला आहे. सुप्रिया यांनी 1 लाख 55,774 चे मताधिक्य मिळवून विजयाची हॅट्ट्रिक साधली. 

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 'श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!' या ओळी त्यांनी ट्वीट केल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी कवितेतून शरद पवारांना 'सलामी' दिली आहे. पवार कुटुंबीयांच्याच नातेवाईक असलेल्या तसेच रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुरुवातीपासूनच सुळे यांच्यासमोर त्यांना तगडे आव्हान निर्माण केले होते. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 6,86,714 तर  कांचन कुल यांना 5,30, 940 मतं पडली आहेत.  


2014 च्या निवडणुकीत घटलेल्या मोठ्या मताधिक्याच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी यंदा चांगलीच दक्षता घेतल्याचे यावेळी दिसून आले. लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांमध्ये जनसंपर्क ठेवण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच  भर दिला. मतदारसंघातील  समस्या, लोकांचे प्रश्न सोडवून देण्यावर त्यांचा विशेष भर होता. बारामती भागात दुष्काळी दौऱ्याच्या माध्यमातून जनसंपर्क कायम ठेवण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. इंदापूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी लक्ष घातले. सोशल मीडियाच्या माध्यमाचा  सुळे यांनी सर्वाधिक प्रभावी वापर करीत तरुणाईशी संवाद साधलेला संवाद त्यांच्यासाठी हा प्लस पॉईंट ठरला. सोशल मीडियावर मतदारसंघातील विविध प्रश्नांसह महत्वाच्या प्रश्नांवर सुळे यांनी  कमालीची आक्रमकता दाखविली. गेली पाच वर्षे लोकसभा मतदारसंघ विविध कार्यक्रम व उपक्रमांनिमित्त पिंजून काढला. संसदेतील उपस्थिती, उपस्थित केलेले प्रश्न आणि सलगपणे मिळालेल्या उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारामुळे लोकसभेतही त्यांनी खासदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला. 

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 : बारामती वाचली, पण शरद पवारांच्या तिसऱ्या पिढीला मतदारांनी नाकारले

भाजपाच्या बड्या नेत्यांनी लक्ष घातल्याने यंदा यंदा प्रथमच बारामतीत राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. गेल्या 55 ते 60 वर्षांपासून या मतदारसंघातील प्रलंबित असलेल्या  पाणीप्रश्नावरून राष्ट्रवादीला लक्ष्य करण्यात आले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या भागात सभा घेऊन पाणी प्रश्नावर परिवर्तन करा, तुमचा प्रश्न सोडवितो, असे खुले आव्हान दिले होते. 

पराभवाकडे दुर्लक्ष करुन दुष्काळी भागात मदतीसाठी जाऊ..!

आमचा 11 जागांचा अंदाज होता. आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. कष्ट घेतले आहेत. त्यामुळे आम्ही व आमचे कार्यकर्ते पराभवाकडे दुर्लक्ष करून आगामी निवडणुकीच्या कामाला लागत आहोत. ज्या जागा आम्ही गमावल्या त्या कमी फरकाने गमावल्या आहेत. या पराभवाचा विचार नक्की करू. राज्यात दुष्काळ भीषण आहे. संकटग्रस्त लोकांना मदत करणार आहे. दुष्काळासंबंधी जो कार्यक्रम हाती घेतला आहे तो तसाच सुरु ठेवणार. - शरद पवार

राष्ट्रवादी पक्षाने एकूण 19 जागा लढवल्या. त्यातल्या 10 जागा भाजपाच्या तर 9 जागा शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीने लढल्या. त्यातील 3 ठिकाणी त्यांनी भाजपला हरवण्याचे काम केले. पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीवरुन घातलेला घोळ, शरद पवार यांनी आधी लढणार, नंतर नाही लढणार अशी संभ्रमावस्था निवडणुका जाहीर झाल्यावर तयार केली त्याचाही फटका राष्ट्रवादीला बसला. बारामती, सातारा, कोल्हापूर आणि माढा या चार जागा 2014 साली राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. त्यापैकी बारामती व सातारा त्यांना राखता आल्या पण कोल्हापूर व माढा मात्र गमवाव्या लागल्या.

 


Web Title: Lok Sabha Election Results 2019 ncp supriya sules emotional tweet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.