विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम आहात का? रवींद्र चव्हाणांनी दिलं असं उत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:07 IST2026-01-06T12:40:42+5:302026-01-06T13:07:08+5:30
Ravindra Chavan News: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील अशा प्रकारच्या केलेल्या विधानावरिोधात काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे.

विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम आहात का? रवींद्र चव्हाणांनी दिलं असं उत्तर, म्हणाले...
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील अशा प्रकारच्या केलेल्या विधानावरिोधात काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, वाद वाढू लागल्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत विलासराव देशमुख यांच्या चिरंजीवांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
रवींद्र चव्हाण हे आज छत्रपती संभाजीनगर येथे आले असताना लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्याबाबत तुम्ही जे वक्तव्य केलं, त्यावर अजूनही ठाम आहात का? असं विचारलं असता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, मी विलासराव देशमुख यांच्यावर कोणत्याही पद्धतीची टीकाटिप्पणी केली नाही. विलासराव हे मोठे नेते होते. मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा अजेंडा हा पूर्णच्या पूर्ण विलासरावांच्या भोवती केंद्रित झालेला दिसत आहे. काँग्रेस पक्ष हा आताही विलासरावांकडे पाहून आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं. विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागत आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, आता त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेलं काम, महायुतीच्या माध्यमातून झालेलं काम, या सर्व गोष्टी विकासात्मक दृष्टीकोनातून या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याचा संदर्भ घेऊन मी तसं म्हटलं. तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव, जे माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांच्या चिरंजींवांची दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगून चव्हाण यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, प्रत्येक महानगरपालिकेची निवडणूक ही कशासाठी असते तर ती त्या ठिकाणी असणाऱ्या नागरी सुविधा ह्या कोणता पक्ष गतिमान पद्धतीने करून देईल, याची निवड करण्यासाठी असते. त्यामुळे लातुरमध्ये सुद्धा गतिमान पद्धतीने सर्व नागरी सुविधा व्हायला हव्यात, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या मताचा मी आहे.