भाजप बंडखोरांच्या ‘निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी’ने वाढविली डोकेदुखी; २८ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 06:28 IST2026-01-04T06:28:37+5:302026-01-04T06:28:37+5:30
विशेष म्हणजे, ही आघाडी आता महायुतीतील इतर घटक पक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे.

भाजप बंडखोरांच्या ‘निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी’ने वाढविली डोकेदुखी; २८ उमेदवार रिंगणात
लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर : महापालिका निवडणुकीत भाजपाकडून तिकीट न मिळालेल्या बंडखोर उमेदवारांनी निष्ठावंत आघाडी स्थापन केली आहे. शनिवारी या उमेदवारांना अपक्ष म्हणून चिन्ह वाटप झाले आहे. तत्पूर्वी सर्वांनी एकत्रित येऊन आम्हाला एकच चिन्ह मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. अपक्षांबरोबर चिन्ह दिले आहे.
पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात मोठी खदखद कायम आहे. उमेदवारी वाटपात डावलल्या गेल्याचा आरोप करत पक्षातील जुन्या आणि जाणत्या कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. नितीन शेटे यांच्या नेतृत्वाखाली ‘निष्ठावंत कार्यकर्ता आघाडी’ स्थापन करण्यात आली असून, या आघाडीचे २८ उमेदवार रिंगणात आहेत.
विशेष म्हणजे, ही आघाडी आता महायुतीतील इतर घटक पक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे. जिथे शिंदेसेनेचे उमेदवार नाहीत, तिथे ‘निष्ठावंत आघाडी’ त्यांना पाठिंबा देईल आणि जिथे आघाडीचे उमेदवार नाहीत, तिथे शिंदेसेना व राष्ट्रवादीला मदत केली जाईल, असे निष्ठावंत कार्यकर्ता आघाडीचे समीकरण आहे. या नवीन समीकरणामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सध्या तरी बंडखोरांनी आपल्याच विजयाची पताका फडकविणार असा चंग बांधला आहे.