Kolhapur North By Election Result: भाजपचा पराभव झाला, आता तुम्ही हिमालयात निघून जाणार का?; चंद्रकांतदादा म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 13:41 IST2022-04-16T13:41:29+5:302022-04-16T13:41:34+5:30
Kolhapur North By Election Result: उत्तर कोल्हापूरात भाजपचा पराभव; चंद्रकांत पाटील राजकारणात सोडून हिमालयात जाणार का..?

Kolhapur North By Election Result: भाजपचा पराभव झाला, आता तुम्ही हिमालयात निघून जाणार का?; चंद्रकांतदादा म्हणतात...
कोल्हापूर: काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसनं विजय मिळवला आहे. जाधव यांच्या पत्नी जयश्री यांनी जवळपास १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत.
उत्तर कोल्हापूर मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ यांच्यासह बड्या नेत्यांची फौज भाजपनं कामाला लावली होती. मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील निवडणूक जाहीर झाल्यापासून कोल्हापुरात ठाण मांडून होते. मात्र तरीही भाजपला विजय मिळवता आला नाही.
चंद्रकांतदादा म्हणाले होते, आपलं चॅलेंज आहे...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत. मात्र असं असूनही जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही, अशी चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात होत असते. त्यावर बोलताना पाटील यांनी थेट आव्हान दिलं होतं. 'आज चॅलेंज आहे आपलं. ज्याला वाटतं असेल त्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभेच्या कोणत्याही मतदारसंघाचा राजीनामा द्यायचा. पोटनिवडणूक लावायची.. निवडून नाही आलो ना तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईन, असं पाटील म्हणाले होते.
आता भाजपच्या पराभवानंतर चंद्रकांतदादा म्हणतात...
चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली. उत्तर कोल्हापूरात आम्ही काय करणार आहोत ते आम्ही सांगितलं होतं. पूर येऊ नये, वाहतूककोंडी होऊ नये यासाठी भाजप काय करेल ते आम्ही जाहीर केलं होतं. पण मतदारांनी आम्हाला कौल दिला नाही. मतदारांचा कौल आम्हाला मान्य आहे, असं पाटील म्हणाले. भाजपचा पराभव झाला तर हिमालयात जाणार असं तुम्ही म्हणाला होतात, याची आठवण पत्रकारांनी त्यांना करून दिली. त्यावर मी काय करायचं ते मी आणि माझं श्रेष्ठी ठरवतील, असं पाटील यांनी सांगितलं.