‘पत्त्यांचा बंगलासुद्धा यापेक्षा जास्त टिकतो’, KDMCतील घडामोडींवरून भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:22 IST2026-01-21T15:21:19+5:302026-01-21T15:22:20+5:30
Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2026 Result: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदेसेनेनेला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

‘पत्त्यांचा बंगलासुद्धा यापेक्षा जास्त टिकतो’, KDMCतील घडामोडींवरून भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सर्वच पक्षांनी महापौरांच्या निवडीसह इतर पदांच्या निवडणुकीसाठी संख्याबळाची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये यावेळी भाजपा आणि शिंदेसेनेची महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंच्या पक्षांची युती अशा लढती झाल्या होत्या. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीने महायुतीला कडवी टक्कर दिली होती. मात्र आता मुंबई जवळच्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदेसेनेनेला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच यावरून आता भाजपाने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
या संदर्भात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात उपाध्ये लिहितात की, महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागून जेमतेम चार दिवस झाले आहे. महाराष्ट्राच्या हिताकरता दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच, तिकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेने उद्धवसेनेची साथ सोडलीच, उबाठाच्या नगरसेवकांनीही ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. पत्त्यांचा बंगलासुद्धा यापेक्षा जास्त टिकतो, असे केशव उपाध्ये म्हणाले.
दरम्यान, आज सकाळपासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर कल्याण-डोंबिवलीमधील शिंदेसेनेचे ५३ नगरसेवक हे गट नोंदणीसाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यांच्यासोबत मनसेचेही ५ नगरसेवक होते. एवढंच नाही तर मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हेही यावेळी उपस्थित होते.