इस्लाम की AIMIM...सत्तेसाठी शिंदेसेना कुणाला देणार साथ?; इम्तियाज जलिल यांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:13 IST2026-01-19T17:12:37+5:302026-01-19T17:13:28+5:30
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ३५ जागा जिंकून माजी आमदार असिफ शेख यांचा इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र (इस्लाम) हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.

इस्लाम की AIMIM...सत्तेसाठी शिंदेसेना कुणाला देणार साथ?; इम्तियाज जलिल यांचा खळबळजनक दावा
मालेगाव - राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर आता प्रत्येक ठिकाणी सत्तेची गणिते जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात मालेगाव महापालिका निकालात इस्लाम पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. याठिकाणी इस्लाम पक्ष सर्वात मोठा असला तरी बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नाही. त्यातच शिंदेसेनेची भूमिका मालेगावात महत्त्वाची ठरणार आहे. या मालेगावात सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेसेनेकडून एमआयएमला विचारणा झाल्याचा दावा माजी आमदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यामुळे मालेगावात शिंदेसेना एमआयएम युती पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरू झाली. परंतु जलील यांनी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
माजी आमदार इम्तियाज जलील म्हणाले की, ३-४ महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी एमआयएमची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आम्ही स्थानिक नेत्यांना स्पष्ट सांगितले आहे. त्यात भाजपा आणि एकनाथ शिंदेंचीशिवसेना वगळून कुठे तरी चांगली आघाडी करता येत असेल आणि सन्मानजनक प्रस्ताव मिळत असेल त्याचा निर्णय पक्ष करेल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही आमचे समर्थन मागितले आहे. तिथे आम्ही त्यांना स्पष्ट नकार दिला आहे. मालेगावसारख्या ठिकाणी आम्ही शिंदेसेनेसोबत जाणार नाही. जे भाजपासोबत आहेत त्यांच्यासोबत जाणार नाही असं त्यांनी सांगितले.
तर मालेगाव महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ४० जागांवर विजय मिळविणाऱ्या इस्लाम आणि समाजवादी पार्टी यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने बहुमतासाठी लागणारी ४३ ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी राजकीय हालचाली गतिमान केल्या असून शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर शिंदेसेनेसह एमआयएम यांच्याकडे बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शहराच्या राजकारणात निवडणूक निकालानंतर कोणती नवीन राजकीय समीकरणे उदयास येतात याबाबत आता सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ३५ जागा जिंकून माजी आमदार असिफ शेख यांचा इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र (इस्लाम) हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. इस्लामसोबत युती करणाऱ्या समाजवादी पक्षाने ५ जागा जिंकल्या आहेत. या दोन्ही पक्षाला मिळून ४० जागा मिळाल्या पण बहुमतासाठी ४३ चा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे अन्य पक्षांचा पाठिंबा फ्रंटला घ्यावा लागत आहे. या निवडणुकीत एमआयएमने २१, शिंदेसेनेने १८, काँग्रेस ३, भाजपाने २ जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, शिंदेसेनेला इस्लाम आणि एमआयएम या दोन्ही पक्षांकडून सत्तेत सहभागी व्हावे असे प्रस्ताव आले आहेत. तर शिक्षणमंत्री दादा भुसे हे वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून मालेगावी कोणासोबत सत्तेत सहभागी व्हायचे हे निश्चित करतील अशी माहिती शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने यांनी दिली.