I will defeat Nitin Gadkari, win more than five lakh votes, claim Nana Patole | नागपुरात गडकरींना हरवणार, पाच लाखांहून अधिक मतांनी जिंकून येणार, नाना पटोलेंचा दावा
नागपुरात गडकरींना हरवणार, पाच लाखांहून अधिक मतांनी जिंकून येणार, नाना पटोलेंचा दावा

नागपूर - लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर आता विविध वृत्तसंस्था, राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून जय-पराजयाबाबत वेगवेगळे दावे करण्यात येऊ लागले आहे. दरम्यान, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथून मोदी सरकारमधील मातब्बर मंत्री नितीन गडकरी यांना आव्हान देणारे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी आपल्या विजयाबाबत मोठा दावा केला आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरींना सुमारे पाच लाख मतांनी पराभूत करणार, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी आपल्या विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. "देशभरात मोदी सरकारविरोधात वातावरण होते. नागपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथेही लोकांच्या मनात सरकारबाबत नाराजी होती. त्यातही नागपूर शहरात कमी मतदान झाले आहे. जे झाले ते काँग्रेसच्या बाजूने मतदान झाले आहे. त्यामुळे प्रचाराच्या आधी म्हटल्याप्रमाणे मी पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार आहे." असा दावा नाना पटोले यांनी केला. 

दरम्यान, एक्झिट पोल हे चुकीच्या पद्धतीने दाखवले जातात. जनतेचा अशा पोलवर विश्वास नाही. या लोकसभा निवडणुकीत देशात सत्तापरिवर्तन झाले आहे. तसेच निकालांनंतर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.  


Web Title: I will defeat Nitin Gadkari, win more than five lakh votes, claim Nana Patole
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.