"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:08 IST2025-09-25T18:05:42+5:302025-09-25T18:08:01+5:30
Aditya Thackeray News: मतचोरीविरोधात राहुल गांधी यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघालेलं असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही मतचोरीच्या मुद्द्यावरून मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत.

"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. तसेच या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मतचोरीविरोधात राहुल गांधी यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघालेलं असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही मतचोरीच्या मुद्द्यावरून मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमधील मुलाखतीदरम्यान मतचोरीवरून सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसबा निवडणुकीत झालेल्या मतचोरीबाबत आम्हीही निवडणूक आयोगाला पत्कर लिहिलं आहे. गतवर्षी झालेल्या निवडणुकीपूर्वी अचानक वाढलेली मतदारांची संख्या, बेपत्ता मतदार आणि मतदार केंद्रावरील अव्यवस्थेबाबत पत्र लिहिलं होतं. आता या सर्व गडबडीबाबत आम्ही पत्रकार परिषद घेऊन जनतेला माहिती देणार आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मात्र याबाबत कधी गौप्यस्फोट करणार, असं विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी सर्जिकल स्ट्राईकची वेळ सांगण्याचे मात्र टाळले.
आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितले की, निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. तसेच याबाबतच्या डेटाची पडताळणी केली जात आहे. ही माहिती आम्ही जनतेसमोर ठेवणार आहोत. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, असा अंदाजही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांना टोला लगावताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही निकाल लागला, तो आम्ही स्वीकारला. मात्र हे सरकार योग्य पद्धतीने काम करत नाही आहे. या सरकारमधील एक उपमुख्यमंत्री कधी आपल्या कधी गावी जातात, नाहीतर कधी दिल्लीत जाऊन तक्रारी करतात.