"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 19:08 IST2026-01-11T19:07:47+5:302026-01-11T19:08:42+5:30
Supriya Sule On Ajit Pawar: महाराष्ट्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा मोठा विश्वास व्यक्त केला आहे.

"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी एक मोठे विधान केले. "अजित पवारांच्या नेतृत्वावर माझा कालही विश्वास होता आणि आजही आहे," असे म्हणत त्यांनी राजकीय चर्चेला उधाण आणले आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी पक्ष विलीनीकरण, भाजपची विश्वासार्हता आणि निवडणुकीतील पैशांचा वापर यावर सडेतोड भाष्य केले.
दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता सुळे म्हणाल्या की, "सध्या असा कोणताही प्रस्ताव आमच्यासमोर नाही. आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र लढवत आहोत, कारण आमची विचारसरणी समान आहे. मात्र, पूर्णपणे एकत्र येण्याबाबतचा निर्णय निवडणुकांनंतरच घेतला जाईल. कुटुंब आणि राजकारण या वेगळ्या गोष्टी आहेत, आमच्यातील राजकीय अंतर अद्याप कायम आहे."
अजित पवारांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला धारेवर धरले. "आम्ही अजित पवारांवर कधीही आरोप केले नाहीत. ७०,००० कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप फडणवीसांनी केले, त्यामुळे उत्तरेही त्यांनीच द्यावीत. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच पक्षात घेऊन भाजपने आपली विश्वासार्हता गमावली आहे." मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपला त्यांनी विचारले की, २५ वर्षे महापालिकेत आणि १० वर्षे राज्यात सत्ता असताना तुम्ही काय केले? असेही त्यांनी म्हटले.
निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या वापराबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. "भाजप पैशांच्या बळावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे सामान्य माणूस निवडणूक लढवूच शकणार नाही. मोदीजींनी भ्रष्टाचारमुक्त भारताचे आश्वासन दिले होते, मग आता जे घडत आहे त्याची ईडी आणि सीबीआयने चौकशी का करू नये?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले
मुंबईतून बांगलादेशी मुस्लिमांना बाहेर काढण्याच्या भाजपच्या आश्वासनावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "गृहमंत्रीपद तुमच्याकडे आहे, सीमा सुरक्षा तुमची जबाबदारी आहे. मग हे लोक देशात आलेच कसे? स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा भाजपने जनतेला उत्तर द्यावे."