‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 20:27 IST2026-01-11T20:26:35+5:302026-01-11T20:27:23+5:30
Harshwardhan Sapkal Criticize Eknath Shinde: शिंदेसेनेने एमआयएमसोबत केलेल्या आघाडीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेवर टीका केली आहे. तसेच हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत, अशी बोचरी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
गेल्या महिन्यात झालेल्या नगर परिषद निवडणुकीनंतर अनेक ठिकाणी उपनगराध्यक्षपद निवडणुकीदरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि शिंदेसेनेने आपल्या विरोधी विचारांच्या पक्षांसोबत युती केल्याचे समोर आले होते. त्यात भाजपाने अकोटमध्ये आणि शिंदेसेनेने बीडमध्ये एमआयएमसोबत आघाडी केली होती. या आघाडीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदेसेनेवर टीका केली आहे. तसेच हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत, अशी बोचरी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
भारतीय जनता पक्ष व एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेसाठी कोणाशीही युती करत आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी पक्षातील कोणालाही न विचारता भाजपाला पाठिंबा दिला हे समजताच त्यांना काँग्रेसने तात्काळ बडतर्फ केले. पण भाजपाने मात्र त्यांना त्यांच्या पक्षात घेतले. अकोटमध्ये ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाशी युती केली तर शिंदेसेनेनेही एमआयएमशी युती केली. प्रचार मात्र खान महापौर होईल, खान हवा का बाण हवा, असे सांगून धार्मिक तेढ निर्माण करायची आणि सत्तेसाठी मात्र ओवैसींच्या पक्षाशी हातमिळवणी करायची, एवढ्या खालच्या स्तराला भाजपाचे राजकारण गेले आहे. हैदराबादचा दाढीवाला व ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हा खेळ लोकांनी ओळखला आहे, असे सपकाळ म्हणाले.
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिक जनतेची मागणी काँग्रेस पक्षाने सातत्याने लावून धरली आहे. नवी मुंबई विमान तळावरून जेव्हा पहिले उड्डाण होईल त्यावेळी दि. बा. पाटील विमानतळ अशी उद्घोषणा ऐकायला येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पण अद्याप विमानळाला नाव दिलेले नाही, हा भाजपाचा कोडगेपणा आहे. देवेंद्र फडणवीस १२ तारखेला पनवेल भागात प्रचारासाठी येणार आहेत, सध्या आचारसंहिता सुरू आहे पण आचारसंहिता संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिल्याचा निर्णय होईल, असे फडणवीस यांनी या सभेतच जाहीर करावे, असे आव्हानही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.