‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:16 IST2026-01-09T16:15:00+5:302026-01-09T16:16:06+5:30
Prakash Mahajan Criticize Sanjay Raut: विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल असताना त्यातून उद्धव ठाकरे यांना बाहेर काढून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसवण्यासाठी किती दलाली घेतली, असा सवाल शिंदेसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारला आहे.

‘युती तोडून उद्धव ठाकरेंना मविआत बसवण्याची किती दलाली घेतली?’, प्रकाश महाजनांचा संजय राऊतांना सवाल
मुंबई - विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला स्पष्ट बहुमताचा कौल असताना त्यातून उद्धव ठाकरे यांना बाहेर काढून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसवण्यासाठी किती दलाली घेतली, असा सवाल शिंदेसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारला आहे.
शिंदेसेनेवर खोक्यांचे आरोप करणाऱ्या उद्धवसेना आणि राऊत यांच्यावर प्रकाश महाजन यांनी जोरदार टीका केली. यावेळी प्रकाश महाजन म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ७ पैकी ६ नगरसेवक किती पैसे देऊन फोडले, त्यासाठी कोणत्या गुजराती कंत्राटदाराकडून पैसे घेतले, अशी विचारणाही प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांच्याकडे केले. खोक्याची भाषा बोलणाऱ्यांना पैशांशिवाय काही दिसत नाही, अशी टीका महाजन यांनी ठाकरेंवर केली.
संजय राऊत २५ वर्षे खासदार असताना त्यांनी मराठी माणसासाठी केलेली किमान पाच कामे दाखवावीत, असं आव्हानही प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांना दिलं. एकनाथ शिंदेंवर आरोप करणारे राऊत हे खासदारच्या रूपात दिल्लीच्या वर्तुळात वावरणारे दलाल आहेत, असा आरोपही प्रकाश महाजन यांनी केला.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी पदयात्रा करणाऱ्या दिवंगत चिंतामण रुईकर या कार्यकर्त्यांच्या कुटुंबाची भेट घ्यायला उद्धव ठाकरे यांना वेळ मिळाला नाही. मात्र याच रुईकर कुटुंबासाठी घर बांधून देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले, असेही महाजन यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांना द्यायचे माहीत आहे तर ठाकरेंना घ्यायचे माहित आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच महायुतीत कोणतीही कुरबुरी नाही, तिन्ही भाऊ मजबुतीने सरकार चालवत आहेत, असे महाजन म्हणाले. मुंबई तोडणार याच गोष्टीवर मागील ३० वर्ष ठाकरे राजकारण करत आहेत. गुजरातची प्रगती बघायला राज ठाकरे स्वत: गेले होते. मुंबईतील मराठी माणूस आणि मुंबईवर त्यांचे प्रेम नाही तर ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची आहे, अशी टीका महाजन यांनी केली.
दरम्यान, परळीमध्ये शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होती. सत्ता स्थापनेसाठी त्यांनी गट स्थापन केला आहे, असे महाजन म्हणाले. छत्रपती संभाजी नगरात मुस्लिम कंत्राटदारांना कंत्राटे देणाऱ्या अंबादास दानवे यांनी केले. एमआयएमच्या मतांवर दानवे विधान परिषदेवर गेले होते, अशी टीका महाजन यांनी दानवेंवर केली.