Holiday Election: राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 14:06 IST2026-01-12T14:05:43+5:302026-01-12T14:06:27+5:30
Holiday Municipal Election 2026: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Holiday Election: राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी
राज्यात एकाचवेळी २९ महापालिकांच्या निवडणुका होत आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील महापालिकांचा समावेश असून, १५ जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान होणार आहे. नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने २९ शहरांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने ६ जानेवारी २०२६ रोजी याबद्दलचे आदेश काढले आहेत. केंद्र व राज्य शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुटी लागू राहील. तसेच महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदार जर शहराबाहेर कार्यरत असतील, तरी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही सार्वजनिक सुटी लागू राहणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशात नमूद आहे.
उद्योग आणि कामगार विभागानेदेखील सार्वजनिक सुटीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, खासगी कंपन्यांतील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स , रिटेलर्स यांना सार्वजनिक सुटी लागू असणार आहे.
सुट्टी देणे शक्य नसेल, तर कार्यालयांना काय आदेश?
अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगारांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत द्यावी, असे अध्यादेशात नमूद आहे.
२९ महापालिकांची यादी
१) बृहन्मुंबई महापालिका
२) ठाणे महापालिका
३) नवी मुंबई महापालिका
४) उल्हासनगर महापालिका
५) कल्याण-डोंबिवली महापालिका
६) भिवंडी-निजामपूर महापालिका
७) मिरा-भाईंदर महापालिका
८) वसई-विरार महापालिका
९) पनवेल महापालिका
१०) नाशिक महापालिका
११) मालेगाव महापालिका
१२) अहिल्यानगर महापालिका
१३) जळगाव महापालिका
१४) धुळे महापालिका
१५) पुणे महापालिका
१६) पिंपरी-चिंचवड महापालिका
१७) सोलापूर महापालिका
१८) कोल्हापूर महापालिका
१९) इचरलकरंजी महापालिका
२०) सांगली मिरज कुपवाड महापालिका
२१) छत्रपती संभाजीनगर महापालिका
२२) नांदेड-वाघाळा महापालिका
२३) परभणी महापालिका
२४) जालना महापालिका
२५) लातूर महापालिका
२६) अमरावती महापालिका
२७) अकोला महापालिका
२८) नागपूर महापालिका
२९) चंद्रपूर महापालिका