'पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोग बनले सत्ताधाऱ्यांचे बटिक, निवडणुकीदरम्यान राज्यात तीन खून’, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:50 IST2026-01-09T16:49:37+5:302026-01-09T16:50:44+5:30
Harshavardhan Sapkal Criticize BJP: पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत पण त्याला हरताळ फासला आहे. सत्तेचा खेळ नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसची लढाई आहे, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

'पोलीस, प्रशासन आणि निवडणूक आयोग बनले सत्ताधाऱ्यांचे बटिक, निवडणुकीदरम्यान राज्यात तीन खून’, काँग्रेसचा आरोप
अहिल्यानगर - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केली जात आहे. उमेदवारांना धमकावले जात आहे, पैशांचे आमिष दाखवून अर्ज भरु दिला जात नाही किंवा मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पडल्या पाहिजेत पण त्याला हरताळ फासला आहे. सत्तेचा खेळ नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसची लढाई आहे, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, विरोधकांना प्रचार करता येऊ नये यासाठी सत्ताधारी पक्ष त्यांची कोंडी करत आहे. विरोधपक्षांना हेलिकॉप्टर मिळू नये, प्रचार सभेसाठी मैदाने मिळू नये साठी ती ब्लॉक केली जात आहेत. निवडणुकीत प्रचार एकतर्फी असता कामा नाही, विरोधकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. हिंसक घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. उमेदवारांना धमकावण्यासाठी खुलेआम बंदुका, कोयते घेऊन फिरत आहेत. राज्यात अकोट, सोलापूर व खोपोली या ठिकाणी आतापर्यंत तीन खून झाले आहेत, हे लोकशाहीसाठी घातक आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुका या पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या महत्वाच्या प्रश्नांवर झाल्या पाहिजेत पण भाजपा महायुती मात्र यावर बोलत नाही. महापौर मराठी हवा की ऊर्दू, खान हवा की बाण यावर भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. दुसरीकडे सत्तेतील तिन मित्रपक्षच एकमेकावर आरोप करत आहेत, हे त्यांचे फिक्सिंग आहे, नुरा कुस्ती आहे. भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष व त्यांचे नेतृत्व विश्वगुरु असल्याचा टेंभा मिरवत असते पण हा त्यांचा दावा पोकळ आहे. भाजपामध्ये लायक नेते
पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारही नाहीत, त्यांना ते विरोध पक्षातून साम, दाम, दंड, भेद, नितीचा वापर करून आणावे लागत आहेत. भाजपातील निष्ठावान कार्यकर्त्यांना फक्त सतरंजा उचलण्याचे काम ठेवले आहे. भारतीय जनता पक्ष विरोध पक्षांच्या नेत्यांना खाणारी चेटकीण आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.