मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी खूशखबर; वीज बिलाबाबत दिलं महत्त्वाचं आश्वासन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 20:13 IST2024-12-19T20:12:38+5:302024-12-19T20:13:50+5:30

२०३० साली राज्यात ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतातील असेल, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Good news for farmers from the Chief Minister devendra fadnavis Important assurance given regarding electricity bills | मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी खूशखबर; वीज बिलाबाबत दिलं महत्त्वाचं आश्वासन, म्हणाले...

मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी खूशखबर; वीज बिलाबाबत दिलं महत्त्वाचं आश्वासन, म्हणाले...

Devendra Fadnavis On Farmer ( Marathi News ): "राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांकडून पुढील ५ वर्ष आपण विजेचे बिल घेणार नाही," असा शब्द देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांना आश्वस्त केलं आहे. तसंच "९ लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौरपंप आम्ही देणार असून ३ महिन्यात जोडणी देऊ. २०३० साली राज्यात ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतातील असेल," असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

शेतकऱ्यांविषयी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी गेल्या अडीच वर्षात १६७ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे २५.६१ लक्ष हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला असून नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना आणि जलसिंचन प्रकल्प यासाठी उपयुक्त आहे. वैनगंगा-नळगंगा, नारपार-गिरणा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे असे नदी जोडप्रकल्प मार्गी लावणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पिकाला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नदीजोड प्रकल्प महत्वाचे आहेत. यासाठी राज्य शासनाने जल आराखडा तयार केला  आहे. राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत असून यामुळेही शेतकऱ्यांना फायदा होणार आहे," अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान, "राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. तसंच राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, असं सांगत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असं मुख्यमंत्री विधानसभेतील भाषणादरम्यान म्हणाले.

Web Title: Good news for farmers from the Chief Minister devendra fadnavis Important assurance given regarding electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.