अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती? कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 06:14 IST2025-12-25T06:14:09+5:302025-12-25T06:14:47+5:30
Raj -Uddhav Thackeray Alliance: अनेक दिवसांपासून राज्याला ठाकरे बंधूंच्या युतीची उत्सुकता होती. युतीमुळे ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. या युतीमुळे राजकीय समीकरणे कशी बदलतात, काय परिणाम होतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती? कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, याच आपल्या भूमिकेला पुढे नेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उद्धवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा केली. मुंबई महापालिकेत आम्ही एकत्र लढू आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणूकही एकत्र लढण्याची घोषणा लवकरच करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईचा महापौर ‘मराठी’ आणि तो आमचाच असेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भाजपला काय हवे ते भाजपने बघावे, मराठी माणसाला काय हवे ते आम्ही बघू, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.
अनेक दिवसांपासून राज्याला ठाकरे बंधूंच्या युतीची उत्सुकता होती. युतीमुळे ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. या युतीमुळे राजकीय समीकरणे कशी बदलतात, काय परिणाम होतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
‘महाराष्ट्रात लहान मुले पळविणाऱ्या टोळ्या’
महाराष्ट्रात लहान मुले पळविणाऱ्या खूप टोळ्या फिरताहेत. ते राजकीय पक्षांमधली मुले पळवतात. त्यामुळे मुंबईत कोण किती जागा लढवणार, हे आता सांगणार नाही, असा टोला राज यांनी भाजप आणि शिंदेसेनेला लगावला.
‘मुंबईसाठीचे कर्तव्य म्हणून आम्ही एकत्र’
मराठी माणसाला सांगतोय, आता चुकाल तर संपाल. आता फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून, पुन्हा एकदा ‘तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका,’ महाराष्ट्राला हाच संदेश देत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईसाठी आमचे कर्तव्य म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. मराठी माणसाला जे हवे आहे तेच आम्ही करत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘दोन्ही घरे आपलीच, मग बंद दाराआड चर्चा कशाला?’
युतीचे जागावाटप कधी?, महापौरपदाबाबत काही चर्चा झाली आहे का? या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांनी, ‘दोन्ही घरे आपलीच असल्याने बंद दाराआड चर्चा कशाला करायची?’ असे विचारले. तर, ‘सगळे पक्ष बाहेर पडूनही महाविकास आघाडी अबाधित आहे,’ असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
‘बघा किती एकमत झाले?‘
खा. संजय राऊत यांनी प्रास्ताविक केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संवाद साधतील, असे म्हणत त्यांनी माइक दोघांपुढे सरकवला; पण, आधी कोण बोलणार, हे ठरले नसल्याने उद्धव यांनी राज यांच्याकडे माईक देत, ‘तू आधी बोल’ म्हटले. त्यावर राज त्यांना म्हणाले, ‘तू बोल.’ परंतु उद्धव यांनी पुन्हा राज यांना बोलण्याची विनंती केली. त्यावर राज यांनी, ‘अरे, तू बोल आधी,’ असे म्हणत माईक उद्धव यांच्या हाती दिला. तेव्हा उद्धव यांनी ‘बघा, आमच्यात किती एकमत झाले !’ असे म्हटल्याने हशा पिकला.
तीच ती स्क्रिप्ट बदला
मराठी माणूस, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार हे स्क्रिप्ट अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे चालवत आहेत, त्यात काही तर बदल करा. मुंबईच्या विकासावर बोललात तर मी तुम्हाला एक हजार रुपये देईन, मागेही मी असेच आव्हान दिले होते; पण ते अजूनही विकासावर बोलत नाहीत. ठाकरे बंधू एकत्रित आले याचा आनंदच आहे; पण ते एकत्र आल्याने राजकीयदृष्ट्या फार काही घडेल असा कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
निवडणुका आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो, मात्र मुंबईकर सूज्ञ आहेत, त्यांना विकास हवा आहे. त्यांनी मुंबईच्या विकासावर एक शब्दही काढला नाही. मुंबईकर मुंबईबाहेर फेकला गेला, मुंबईचे प्रकल्प कोणी अडवले, मुंबईला प्रदूषित करण्याचे काम कोणी केले?
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री