मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 18:44 IST2024-11-11T18:43:11+5:302024-11-11T18:44:13+5:30
Ramdas Athavale Statement: इच्छुकांच्या स्पर्धेत आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनीही आपली उपस्थिती नोंदविली आहे.

मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुती आणि महाविकास आघाडीतही रस्सीखेच सुरु आहे. सर्वच पक्ष आपापले दावे करत आहेत. जनतेच्या मनात काय आहे हे येत्या २० तारखेला ईव्हीएममध्ये बंद होईलच परंतू, या इच्छुकांच्या स्पर्धेत आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांनीही आपली उपस्थिती नोंदविली आहे.
पत्रकार परिषदेत आठवलेंना मुख्यमंत्री व्हायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आठवले शैलीत उत्तर दिले. मी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांतच चढाओढ आहे. पण अशी काही संधी मिळाली तर मला केंद्रीय मंत्र्यापेक्षा मुख्यमंत्री व्हायला आवडेल, असे आठवले म्हणाले.
भाजपाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरही आठवले यांनी मत व्यक्त केले. भाजपाचा अजेंडा जरी असला तरी हिंदू देशात त्यांना मेजॉरिटी नाही. आम्ही काही मुद्द्यांवर मतभेद असले तरी आम्ही एनडीए सोबत आहोत. अनेक पक्ष होते जे अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये होते. मोदींचा अजेंडा सबका साथ सबका विकास आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजपाचा अल्पसंख्यांक मोर्चादेखील आहे. भाजपाचा हिंदुत्वाचा अजेंडा आधीपासून आहे. मोदींचा सबका साथ असल्याने त्यांना पाठिंबा आहे, असे आठवले म्हणाले.
मनोज जरांगे यांनी एका जातीवर निवडणूक नको म्हणून माघार घेतली. सर्व समाजाचा पाठिंबा हवा आहे, हे त्यांना समजले. मुस्लिम लोकांना घाबरण्याचे कारण नाही, असे आठवले म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंसोबत असताना शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र होती. आरपीआय सोबत आल्यानेच भाजपा-शिवसेनेला महायुती म्हटले गेले. अजित पवार आले किंवा अन्य कोणी आले म्हणून नाही, त्यांचे स्वागत आहे, असे आठवले म्हणाले.