पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 09:25 IST2025-10-26T09:25:51+5:302025-10-26T09:25:51+5:30
Dr. Sampada Munde Suicide Case: या प्रकरणातील आरोपी पीएसआय बदने आणि कर्मचारी बनकरला अटक करुन तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
Dr. Sampada Munde Suicide Case:सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे या तरुण डॉक्टर महिलेच्या आत्महत्येने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. यात त्यांनी पीएसआय बदने आणि कर्मचारी बनकर या दोघांकडून छळ झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. पोलिस दलातील अधिकाऱ्यांवर थेट आरोप झाल्याने राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे.
या प्रकरणानंतर आरोपी पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली असून, पीएसआय गोपाळ बदने स्वतः पोलिसांना शरण आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
📍कवडगाव ता. वडवणी.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 25, 2025
सातारा जिल्ह्यातील फलटण उप जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डाॅ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची आज कवडगाव ता. वडवणी येथे जाऊन भेट घेतली व आई-वडिलांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. डाॅ संपदा यांचा मृत्यू अतिशय वेदनादायी आहे, मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी… pic.twitter.com/jgbQEETbJr
पंकजा मुंडेंची मुख्यमंत्र्यांना मागणी...
या दुर्दैवी घटनेनंतर भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी डॉ. संपदाच्या आई-वडिलांना धीर देत म्हटले की, “संपदाचा मृत्यू अतिशय वेदनादायी आहे. मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. तिला न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.”
या भेटीनंतर पंकजा मुंडे यांनी साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना फोन करुन या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच त्या लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यभरातून कठोर कारवाईची मागणी
या प्रकरणामुळे वैद्यकीय आणि पोलिस क्षेत्रात खळबळ उडाली असून, सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वाढत आहे. डॉ. संपदाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असा स्वर आता सर्व स्तरांतून उमटत आहे.