'महा'शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण! शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:13 IST2024-12-05T09:12:40+5:302024-12-05T09:13:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन झाल्यापासून शपथविधी सोहळा संपन्न होईपर्यंत सर्वकाही लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येईल

'महा'शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण! शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे उपस्थित राहणार?
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. संध्याकाळी ५.३० वाजता हा सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली असून त्यात राज्यातील प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यासह प्रमुख नेते या सोहळ्याला उपस्थित राहतील. या सोहळ्याचं निमंत्रण शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनाही देण्यात आले आहे. त्यामुळे ते सोहळ्याला उपस्थित राहणार का याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील १९ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांनाही सोहळ्याचं निमंत्रण दिले आहे. त्याशिवाय केंद्रीय मंत्री या सोहळ्यात उपस्थित राहतील. राजशिष्टाचार विभागाकडून देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे.
शपथविधी सोहळा नेमका कसा असणार?
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा लोकोत्सवाच्या स्वरुपात संपन्न होणार
या शपथविधी सोहळ्याचं पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी लाईव्ह प्रसारण केले जाईल
महाराष्ट्रातील बसस्टॉप, थिएटर तसेच सार्वजनिक ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे सोहळा लाईव्ह दाखवण्यात येईल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आगमन झाल्यापासून शपथविधी सोहळा संपन्न होईपर्यंत सर्वकाही लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येईल
या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यात उद्योगपती, बॉलिवूड-मराठी कलाकार यांचाही समावेश असेल
या शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानात ६०-७० हजार लोकांची उपस्थिती असेल
भाजपाकडून प्रत्येक जिल्ह्यातील २९ प्रमुख पदाधिकाऱ्यांना निमंत्रण
लोकसभा, राज्यसभा सदस्य
माजी खासदार, आमदार
केंद्रीय पदाधिकारी, राज्य पदाधिकारी
विभाग संघटन मंत्री, विशेष निमंत्रित सदस्य
लोकसभा, विधानसभा कोअर कमिटी प्रमुख
जिल्हाध्यक्ष, महामंत्री, मुंबईतील पदाधिकारी
प्रदेश प्रवक्ते, मंडल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष
महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य