Municipal Election 2026: पुणे महापालिकेत एकत्र येण्यासाठी अजित पवारांनी काँग्रेसच्या 'या' नेत्याला केला फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:11 IST2025-12-24T16:06:53+5:302025-12-24T16:11:22+5:30
महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्यासाठी प्लॅन ए तयार केला आहे. कदाचित प्लॅन बीही होऊ शकतो

Municipal Election 2026: पुणे महापालिकेत एकत्र येण्यासाठी अजित पवारांनी काँग्रेसच्या 'या' नेत्याला केला फोन
कोल्हापूर : महायुतीमधील अनेक इच्छुक उमेदवार आता काँग्रेसमध्ये येण्यास तयार आहेत. मात्र, आमची गाडी भरली आहे, आमच्याकडे जागा नाही, या शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी इतर पक्षांतून काँग्रेसमध्ये येणाऱ्यांना उमेदवारी देता येणार नसल्याचे मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीत एकत्र येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला हाेता, पण तो पुणे महापालिका निवडणुकीसाठी होता. कोल्हापूर आणि इचलकरंजीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी खासदार शाहू छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.
वाचा : सन्मानाने जागा द्या, अन्यथा मातोश्रीवर विषय मांडू; उद्धवसेनाही नमते घेईना
आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असून, उद्धवसेनेसोबत जागावाटपात एकमत झाले असून, इतर पक्षांच्या मागण्यांवर तोडगा काढत महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसांत ठरवू. महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली होती. या समितीने घटक पक्षांशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
वाचा : ईर्ष्या दिसली, पहिल्याच दिवशी ५१० अर्जांची विक्री
त्यानंतर चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्या असून, उद्ववसेनेबरोबर जागांची निश्चिती झाली आहे. राष्ट्रवादी व इतर पक्षांबरोबर बोलणी सुरू असून, दोन दिवसांत जागावाटपांचे सूत्र अंतिम केले जाईल.
पुण्यात प्लॅन बीही होऊ शकतो
पुणे महापालिका निवडणुकीबाबात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला होता. मात्र, सध्या आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्यासाठी प्लॅन ए तयार केला आहे. कदाचित प्लॅन बीही होऊ शकतो, असे सांगत आमदार पाटील यांनी पुण्यात काँग्रेस आणि अजित पवार गटाच्या युतीचे संकेत दिले.
कोल्हापूर टक्केवारीमुक्त करणार
कोल्हापूर शहराला टक्केवारीमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे सांगत कोल्हापूरला सर्वाधिक आश्वासने देऊन महायुती सरकारने त्यांचे नाव गिनीज बुकात नोंद केल्याचा टोला आमदार पाटील यांनी लगावला. आमच्या काही इच्छुक उमेदवारांना आता त्रास देणे सुष् केले आहे. काही अधिकारी बांधकामसह इतर विषयांवर नोटिसा देत आहेत. पण, १६ जानेवारीला महापालिकेत आम्हीच असणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.
इचलकरंजीत एकसंघ लढणार
इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठका झाल्या आहेत. तेथील काही कार्यकर्ते मला भेटले आहेत. त्यामुळे इचलकरंजीत महाविकास आघाडी म्हणूनच लढू, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.