कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:23 IST2025-08-21T18:13:34+5:302025-08-21T18:23:35+5:30

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: राज्य शासनाच्या या निर्णयाने कोकणात जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांना त्याचा फायदा होणार आहे. 

DCM Eknath Shinde Announcement of toll waiver for Ganesh devotees going to Konkan; Where will vehicle owners get special passes? | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

Ganpati Utsav Toll Waiver: गणेशोत्सवाला काहीच दिवस शिल्लक आहेत. मुंबईतून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय गौरी गणपती सणाला गावाकडे जातात. याच कोकणवासियांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफीची सवलत देण्यात आली आहे. 

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर  या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.

यासाठी “गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येतील.  या पासवर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच या संदर्भात जाहिरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयाने कोकणात जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांना त्याचा फायदा होणार आहे. 

दरम्यान, राज्य परिवहन विभागाकडूनही गणेशोत्सवात जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. मुंबई, ठाणे व पालघरमधील कोकणातील चाकरमान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी यंदा २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान ५,२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिकांना विशेष बसमध्ये सवलत असणार आहे. नियमित एसटी स्टॅण्डवरील गर्दी टाळण्यासाठी महामुंबईत तात्पुरते ४० बस थांबेदेखील निश्चित केले आहेत. गौरी-गणपतीत जादा वाहतुकीसाठी मुंबई, पालघर, ठाणे विभागातून प्रवाशांच्या मागणीनुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरूपात जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकेदेखील तैनात करण्यात येणार आहेत.

Web Title: DCM Eknath Shinde Announcement of toll waiver for Ganesh devotees going to Konkan; Where will vehicle owners get special passes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.