तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 11:53 IST2025-09-02T11:52:02+5:302025-09-02T11:53:12+5:30
श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वर्तनावरून व व्यवहारावरून नवाच वाद पेटला आहे.

तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
लोकमत न्यूज नेटवर्क
तुळजापूर (जि. धाराशिव): श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वर्तनावरून व व्यवहारावरून नवाच वाद पेटला आहे. आजी-माजी पदाधिकारी यात आमने-सामने आले असून, धर्मादाय आयुक्तांपर्यंत लेखी तक्रारी पोहोचल्या आहेत. विद्यमान विश्वस्त मंडळ उद्देशाविरुद्ध वर्तणूक ठेवून भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असल्याचा आरोप माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी केला आहे. तर विद्यमान अध्यक्षांनी यामागचे बोलविते धनी कोण, हे समोर आणू, असे प्रत्युत्तर देऊ केले आहे.
पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या लेखी तक्रारीनुसार, विश्वस्तांनी न्यासाच्या प्रॉपर्टीबद्दल जे दुर्लक्ष केलेले आहे, त्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे. या प्रकाराची चौकशी होऊन सध्याचे विश्वस्त मंडळ तात्काळ बडतर्फ किंवा निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पुजारी मंडळ स्थापनेचा जो उद्देश आहे, त्याविरुद्ध वर्तन सध्या सुरु असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांच्यासह इतरही काही पुजाऱ्यांनी याबाबतीत तक्रार केली आहे. यास विद्यमान अध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कागदपत्रांसह उत्तर सादर करणार
तीर्थक्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यामुळे काही जणांची पुजारी मंडळ ताब्यात घेण्याची धडपड सुरू आहे. मात्र, यासाठी आपल्या पुजारी बांधवांची दिशाभूल करू नका, इतकंच सांगणं आहे. सध्या हा विषय धर्मादाय आयुक्त यांच्याकडे निर्णयासाठी गेला असला तरी लवकरच चांगल्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विचारांचे लोक मंडळात यावेत, ही इच्छा आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आम्ही जे काम केले, त्याची माहिती कागदपत्रांसह सादर करु. सोबतच, काही स्वार्थी लोक आणि त्यांच्या पाठीमागील सूत्रधार यांचीही माहिती समोर आणू, असे पुजारी मंडळाचे प्रभारी अध्यक्ष विपीन शिंदे यांनी म्हटले.
विठ्ठलाच्या लाडू प्रसादामध्ये अळ्या
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये चक्क अळ्या आणि लाडूला बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला आहे. लाडू बनविणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी मनमोहन अनिल अभंगराव यांनी केली. दरम्यान, लाडूमध्ये नव्हे तर पाकिटामध्ये अळी दिसून येते. लाडू दररोज तयार करून विकले जातात. हा प्रकार गंभीर आहे. संबंधित कामगारांना नोटीस दिली आहे, असे व्यवस्थापक राजेंद्र राऊत यांनी सांगितले.