“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 15:59 IST2024-09-30T15:55:59+5:302024-09-30T15:59:52+5:30
Congress Balasaheb Thorat: राज्यात महायुतीबाबत नाराजी आहे. भाजपाची कृती लोकशाही विरोधी आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
Congress Balasaheb Thorat: एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपांवरून बैठकांचे, चर्चांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी करत सक्षम पर्याय देण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांकडून जागा जिंकण्याबाबत दावे केले जात आहेत. यातच देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसाठी आता विरोधी पक्षनेता ठरवावा, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना, भाजपाची कृती लोकशाही विरोधी आहे. ऑपरेशन लोटस याचा अर्थ पैसा द्यायचा व आमदार फोडायचा असा आहे. जनतेला भाजपाची नीती समजली आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. हर्षवर्धन पाटील भाजपाला रामराम करून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना, हर्षवर्धन पाटील यांना मोठी संधी मिळाली होती. त्यांच्याकडे क्षमता आहे. भाजपात जाऊन चुकले असे वाटते. त्यांचे व्यक्तिमत्त्व काँग्रेस विचारसरणीत घडले आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा
राज्यात महायुतीबाबत नाराजी आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. निवडणुकीत निवडून येईल, हा निकष आहे. महाविकास आघाडी १८० जागा जिंकेल. महायुतीचा विरोधी पक्षनेता कोण होणार हे देवेंद्र फडणवीस यांनी ठरवावे, असा खोचक टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला. तसेच मराठा समाजाला न्याय मिळावा ही भूमिका आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी या बाबत प्रयत्न केले. आमची सत्ता गेली. त्यानंतर न्यायालयात बाजू मांडली नाही. मात्र १६ टक्के आरक्षण देणे शक्य आहे. मराठा समाजाला आरक्षण व संधी मिळाली पाहिजे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठे यश मिळाले. यामुळे राष्ट्रवादीतून लढण्यासाठी अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे.