“विधानसभा निवडणुकीत मविआच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 16:23 IST2024-09-12T16:22:46+5:302024-09-12T16:23:45+5:30
Congress Balasaheb Thorat News: मुस्लिम उमेदवार देण्याबाबत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करत, महायुतीला काँग्रेस नेत्याने खोचक टोला लगावला.

“विधानसभा निवडणुकीत मविआच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल नाही”; काँग्रेस नेत्याचा दावा
Congress Balasaheb Thorat News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जागावाटप आणि लोकसभेची लय कायम ठेवण्यावर महाविकास आघाडीचा भर राहणार आहे. तर दुसरीकडे महायुती सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या १८० पेक्षा जास्त जागा आल्यास नवल वाटू नये, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत १२५ जागांवर सहमती झाली असून राहिलेले जागावाटप देखील लवकरच पूर्ण होईल. गणेशोत्सवानंतर चर्चा करून सर्वांच्या सहमतीने जागावाटप पूर्ण होईल. एमआयएमबाबत प्रस्ताव आल्याची मला माहिती नाही. मात्र, जे काही निर्णय होतील ते उच्च पातळीवर होतील, अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
आमचे जागावाटप लवकरच पूर्ण होईल
आमच्या दोन-तीन बैठका आत्तापर्यंत झाल्या आहेत. आमचे जागा वाटप लवकरच पूर्ण होईल आणि राज्यात महाविकास आघाडी १८० पेक्षा जास्त जागा निवडून आल्या तर नवल वाटू देऊ नका, असा दावा थोरात यांनी केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून मुस्लिम उमेदवार देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर बोलताना, उद्धव ठाकरेंनी याबाबत कायम भूमिका मांडलेली आहे. ते धर्मात भेद करत नाहीत. देश विरोधी वागणाऱ्या मुस्लिमांच्या विरोधात आम्ही आहोत, असे उद्धव ठाकरे नेहमी सांगतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचे निश्चित कौतुक केलं पाहिजे, त्यांनी योग्य अशी भूमिका घेतली आहे. मुस्लिमांना त्यांच प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे हे योग्य आहे, असे सांगत थोरात यांनी समर्थन केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावर, सरन्यायाधीश यांचे नाव मोठे आहे. ते महाराष्ट्रातील आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच वाटतो. न्यायव्यवस्थेवर सरकार दबाव टाकते, ही चर्चा सध्या सुरू आहे. मात्र चंद्रचुड हे त्या पलीकडचे आहेत, असे थोरात म्हणाले. तसेच महायुतीत मैत्रीपूर्ण लढती नव्हे तर खऱ्याखुऱ्या लढती सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? अशी चर्चा आम्ही कधीच करत नाही, असा टोला थोरात यांनी लगावला.