भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:05 IST2026-01-07T11:46:51+5:302026-01-07T12:05:35+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथ आणि अकोटमधील भाजपने केलेल्या आघाडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."
CM Devendra Fadnavis on BJP Congress AIMIM Alliance: अकोल्यातील अकोट आणि ठाण्यातील अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजपने एमआयएम आणि काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्तेसाठी भाजपने कट्टर विरोधकांसोबत आघाडी केल्याने विरोधकांकडून टीकास्त्र डागलं जात आहे. दुसरीकडे या आघाडीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "काँग्रेस आणि एमआयएमसोबत भाजपची युती कधीच होऊ शकत नाही, हा प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांचे कान टोचले आहेत.
अकोट नगरपालिकेत स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपने अकोट विकास मंच स्थापन केला. यामध्ये चक्क ओवेसींच्या एमआयएम पक्षाला सोबत घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. दुसरीकडे, अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने थेट काँग्रेसशी हातमिळवणी केली. काँग्रेसमुक्त भारतचा नारा देणाऱ्या भाजपने सत्तेसाठी पक्षाची मूळ विचारधारा सोडल्याची टीका विरोधकांकडून होत होती. त्यानंतर आता एबीपीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही प्रकरणांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
"मी स्पष्ट शब्दात सांगतोय काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणतीही आघाडी चालणार नाही. ही आघाडी तोडावी लागेल. जर स्थानिक पातळीवर ही गोष्ट कोणी केली असेल तर ते चुकीचे आहे. हा शिस्तभंग आहे. याच्यावर कारवाई होणार. हे चालणार नाही. मी आदेश दिले आहेत आणि १०० टक्के यावर कारवाई होणार," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अकोट आणि अंबरनाथमधील गणिते विस्कटणार?
अकोटमध्ये स्थापन झालेल्या ' अकोट विकास मंच'ची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे आधीच झाली असून, भाजपचे आमदार रवी ठाकूर हे या आघाडीचे गटनेते आहेत. मात्र, आता मुख्यमंत्र्यांच्या कडक पवित्र्यानंतर ही आघाडी टिकणार की भाजप माघार घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबरनाथमध्येही काँग्रेससोबतची युती तोडावी लागण्याची शक्यता आहे.
विरोधकांच्या टीकेला उत्तर
देशपातळीवर एमआयएम आणि काँग्रेसवर सडकून टीका करणाऱ्या भाजपने अकोट आणि अंबरनाथमध्ये आघाडी केल्याने विरोधकांनी चांगलेच घेरले होते. सत्तेसाठी भाजप तत्त्वे गुंडाळून ठेवत आहे, असा आरोप होत असतानाच, मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट कारवाईचा इशारा देऊन हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला आहे. आता या प्रकरणावरून भाजपमधील अंतर्गत कलह समोर येतो की स्थानिक नेते आदेशानंतर आघाडी मोडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.