संगमेश्वरमध्ये संभाजी महाराज, आग्र्यात शिवरायांचे स्मारक उभारणार; पानिपतातही भगवा फडकणार! अजित पवारांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:45 IST2025-03-10T15:45:32+5:302025-03-10T15:45:50+5:30

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज, आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि हरियाणातील पानिपत येथे स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून स्मारक उभारण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे...

chhatrapati Sambhaji Maharaj in Sangameshwar, Shivaji Maharaj in Agra and Maratha's memorial will also built in Panipat says ajit pawar | संगमेश्वरमध्ये संभाजी महाराज, आग्र्यात शिवरायांचे स्मारक उभारणार; पानिपतातही भगवा फडकणार! अजित पवारांची मोठी घोषणा

संगमेश्वरमध्ये संभाजी महाराज, आग्र्यात शिवरायांचे स्मारक उभारणार; पानिपतातही भगवा फडकणार! अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2025: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा वर्ष २०२५-२६ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी, त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित, संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक असलेल्या आणि महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल, अशा काही मोठ्या घोषणाही केल्या आहेत. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj), आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)आणि हरियाणातील पानिपत येथे स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून स्मारक उभारण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
  
पवार म्हणाले, "छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या  छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या, स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मी करतो."

याशिवाय, "छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे," अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली. तसेच, आता दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला असल्याचेही पवार म्हणाले.

आग्र्यात भव्य स्मारक उभारणार -  
"मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका, हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल," असेही पवार यांनी जाहीर केले.

"येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे," असेही पवार यांनी सांगितले.

पानिपत येथेही स्मारक उभारणार - 
याशिवाय, "स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे  प्रतिक म्हणून, हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल," अशी घोषणाही अजित पवार यांनी यावेळी केली.
 

Web Title: chhatrapati Sambhaji Maharaj in Sangameshwar, Shivaji Maharaj in Agra and Maratha's memorial will also built in Panipat says ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.