अजित पवारांकडून बालेकिल्ल्यातच आव्हान; बारामती लढण्याच्या घोषणेवर शरद पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 06:04 PM2023-12-02T18:04:58+5:302023-12-02T18:07:36+5:30

अजित पवार यांच्या बारामतीची जागा लढण्याच्या घोषणेनंतर शरद पवार यांनी आज याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Challenge from Ajit Pawar in baramati loksabha seat Sharad Pawar reaction | अजित पवारांकडून बालेकिल्ल्यातच आव्हान; बारामती लढण्याच्या घोषणेवर शरद पवार म्हणाले...

अजित पवारांकडून बालेकिल्ल्यातच आव्हान; बारामती लढण्याच्या घोषणेवर शरद पवार म्हणाले...

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेसोबत युती करत राज्य सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यातच अजित पवार यांनी आपल्या गटाच्या राज्यव्यापी  शिबिरात पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर थेट हल्लाबोल केल्याने दोन्ही गटातील दरी आणखीनच वाढली आहे. तसंच यावेळी अजित पवार यांनी आपला पक्ष बारामती लोकसभेची जागा लढवणार असल्याचं सांगत शरद पवार आणि बहीण सुप्रिया सुळे यांना खुलं आव्हान दिलं. अजित पवार यांच्या या घोषणेनंतर शरद पवार यांनी आज याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा लढवण्याच्या अजित पवारांच्या घोषणेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, "संसदीय लोकशाहीत कोणताही पक्ष आपला कार्यक्रम घेऊन एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे बारामती मतदारसंघ असेल किंवा अन्य मतदारसंघातही इतर पक्षांना, इतर घटकांना आपला विचार जनतेसमोर मांडण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक लढवली, तर तक्रार करण्याचं कारण नाही. शेवटी लोकांसमोर जाऊन भूमिका मांडायची असते आणि त्याबद्दल लोक जो निर्णय घेतील, तो स्वीकारायचा असतो."

वैयक्तिक हल्ल्यावर काय म्हणाले पवार?

अजित पवार गटाच्या कालच्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. त्यावरही पवारांनी आज भाष्य केलं आहे."मी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेसोबत मागील ६० वर्षांपासून काम करत आहे. वैयक्तिक हल्ले, टीका-टिपण्णी याची सवय मला आहे. पण ही टीका किती योग्य आहे, ती कोण करतंय, ती योग्य आहे की नाही, हे लोक ठरवत असतात. त्यामुळे कुठूनही असे हल्ले झाले तरी हरकत नाही," असं ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीबाबत काय म्हणाले होते अजित पवार?

"लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या विचारांचे जास्तीत जास्त खासदार निवडून येण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. बारामती, शिरूर, रायगड आणि सातारा या चार मतदारसंघात आपण निवडणूक लढवणारच आहोत. पण त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिथं खासदार आहेत, त्यातील काही जागा आपल्याला मिळण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत," असं अजित पवार यांनी कर्जत येथील पक्षाच्या शिबिरात म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया काय?

बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी दिलेल्या आव्हानावर बोलताना म्हटलं की, "मी लोकशाहीवर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी महाराष्ट्रातील आणि भारतातील नागरिक आहे. लोकशाहीत एखाद्या पक्षाला कुठून लढायचं आहे, हा त्यांचा अधिकार आहे," असं सु्प्रिया सुळेंनी म्हटलं आहे. कुटुंबातील एक व्यक्ती बारामतीसारख्या जागेवर जिथं तुम्ही खासदार आहात, तिथं आमचा पक्षही निवडणूक लढवणार आहे, असं म्हणतो त्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावर खासदार सुळे म्हणाल्या की, "आमची नाती आणि आमचं प्रोफेशन वेगळं आहे. या दोन्हीमध्ये कधीच गल्लत करायची नसते. लोकशाहीत कोणीतरी माझ्याविरोधात लढणारच. त्यामध्ये गैर काय? कोणीतरी लढलंच पाहिजे, असा माझा आग्रह राहणार आहे. ही वैयक्तिक लढाई नाही, ही वैचारिक लढाई आहे. कोण योग्य आहे, हे बारामतीची आणि महाराष्ट्राची जनता ठरवेन."

Web Title: Challenge from Ajit Pawar in baramati loksabha seat Sharad Pawar reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.