Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 21:07 IST2025-12-29T21:04:54+5:302025-12-29T21:07:08+5:30
Maharashtra Municipal Election: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक अत्यंत धाडसी आणि मोठा निर्णय घेतला आहे.

Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपने एक अत्यंत धाडसी आणि मोठा निर्णय घेतला आहे. पक्षात घराणेशाहीला थारा न देण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षातील मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे.
भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची अधिकृत माहिती दिली. पक्षाच्या या नव्या धोरणानंतर त्यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ कोल्हापूरच नव्हे, तर नाशिकमध्येही भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलाने आणि आमदार सीमा हिरे यांच्या मुलीनेही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. ऐन शेवटच्या क्षणी भाजपने घेतलेल्या या निर्णयाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. विरोधकांच्या घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपने स्वतःपासून बदलाची सुरुवात केली आहे. नातेवाईकांना डावलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश जाऊन बंडखोरी कमी होईल, असा पक्षाचा अंदाज आहे. प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबाबाहेरच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
खासदार धनंजय महाडिक यावेळी म्हणाले की, "कृष्णराज महाडिक यांनी वरिष्ठांच्या परवानगीनेच अर्ज दाखल केला होता. मात्र, काल झालेल्या बैठकीत नातेवाईकांनी निवडणूक लढवू नये, असा निर्णय झाला. आम्ही पक्षाला मानणारे लोक आहोत, त्यामुळे पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य आहे."