“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:32 IST2025-11-24T17:28:46+5:302025-11-24T17:32:55+5:30
Maharashtra Local Body Election 2025: कोणतीही निवडणूक शेवटची नसते. प्रत्येक निवडणुकीचे वेगवेगळे महत्त्व असते, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे.

“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
Maharashtra Local Body Election 2025: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होत आहेत. बिनविरोध होणाऱ्या निवडणुकांवरून विरोधक महाविकास आघाडी सत्ताधारी महायुतीवर टीका करत आहेत. यातच मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढत असल्याने मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढल्याचे चित्र आहे. यातच राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाला भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मला फक्त एवढीच गोष्ट सांगायची आहे की, रात्र वैऱ्याची आहे. गाफील राहू नका. आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारचे राजकारण आता सुरू आहे आणि मुंबईवर ज्या प्रकारचा डोळा आहे. ज्या प्रकारे आता मतदारयाद्यांतून सुरू आहे, याच्यावर लक्ष ठेवा. आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत, खोटे आहेत; यावर तुमचे लक्ष असणे गरजेचे आहे. ते आवश्यक आहे. एकच गोष्ट सांगतो की, मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, ही शेवटची महानगरपालिका निवडणूक असेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न
भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न आहे. मला वाटते की, कोणतीही निवडणूक शेवटची नसते. प्रत्येक निवडणुकीचे वेगवेगळे महत्त्व असते. मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचा विकास करणे. २०२९ची मुंबई, २०३५ ची मुंबई आणि २०४७ ची मुंबई कशी असेल याचा जो आराखडा देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला, त्या विकसित मुंबईच्या आराखाड्याला मते मिळणार आहेत. जात-पंथ-धर्माचे राजकारण करून मते मिळणार नाहीत, तर विकसित मुंबईकरिता मते मिळतील असे मला वाटते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईमध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसे सामील होणार की नाही, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यावरून मुंबईच्या राजकारणात जोरात चर्चा सुरू आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. मनसेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्यास शरद पवार सकारात्मक असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे मनसे-महाविकास आघाडी होणार की नाही, याबद्दल तूर्त तरी चर्चाच आहेत.