“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:11 IST2025-11-28T16:09:18+5:302025-11-28T16:11:43+5:30
BJP Leader Ram Naik News: जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा गैरलाभ घेऊन ‘मुंबई’वरून विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजू नये, अशी टीका राम नाईक यांनी केली.

“३० वर्षांनी ‘मुंबई’चे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये”; राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले
BJP Leader Ram Naik News: केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून मुंबई केले नाही, याचा आनंद असल्याचे विधान केले होते. या विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई नको, बॉम्बेच हवे यातून हे शहर हळूच ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी मुंबई नंतर संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला होता. या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी उडी घेतली असून, विरोधकांचा समाचार घेतला.
राज यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान व मनुष्यबळ विकास मंत्री यांना पत्र लिहून आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई केले पाहिजे, अशी विनंती करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच बॉम्बेचे मुंबई नामकरण करण्यामागे भाजपा नेते रामभाऊ नाईक यांचा मोठा वाटा आहे. आमच्यासाठी ते बॉम्बे नाही तर मुंबईच आहे. अशा प्रकारच्या ज्या बॉम्बेच्या खुणा आहेत त्या संपवून तेथे मुंबईच आले पाहिजे. मात्र, काही लोक सोईस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळेत शिकवितात त्याचे नाव बदलले पाहिजे, अशा प्रकारची विनंती करत नाहीत, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर आता राम नाईक यांनी विरोधकांना सुनावले आहे.
विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजू नये
राम नाईक यांच्या सहा वर्षांच्या अविरत प्रयत्नांनंतर केंद्र सरकारने 'बॉम्बे' 'बम्बई' ऐवजी सर्व भाषांत 'मुंबई' हेच नाव वापरण्याचा अध्यादेश १५ डिसेंबर १९९५ रोजी जारी केला होता. मात्र नुकतेच केंद्रीय राज्य मंत्री जितेंद्र सिंह यांनी बॉम्बेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेच्या संदर्भात राम नाईक यांनी भूमिका मांडली. सिंह यांच्या वक्तव्याचा गैरलाभ घेऊन विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजू नये, 'बॉम्बे' 'बम्बई' चे 'मुंबई' करण्यामागच्या आमच्या यशस्वी प्रयत्नांनी इतिहास घडविला आहे असे ते म्हणाले.
'मुंबई'चे श्रेय घेण्याचा आता ३० वर्षांनी प्रयत्न करु नये
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईच्या इतिहासाची पूर्ण माहिती नसल्याने 'आयआयटी'च्या नावातील 'बॉम्बे'ची भलामण केली असली, तरी वस्तुस्थिती समजल्यावर ते नक्कीच आपले विधान मागे घेतील, असा विश्वास 'बॉम्बे', 'बम्बई'चे 'मुंबई' करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी व्यक्त केला. मात्र संपूर्ण इतिहास माहिती असलेल्या विरोधकांनी त्यावरून टीकेची झोड उठवून 'मुंबई'चे श्रेय उपटण्याचा आता ३० वर्षांनी प्रयत्न करु नये, असा इशाराही नाईक यांनी यावेळी दिला.
दरम्यान, वर्षानुवर्षे पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्राची अस्मिता राखण्याचा ऐतिहासिक निर्णय करण्याचे भाग्य मला लाभले, बॉम्बे, बम्बईचे मुंबई झाले. बॉम्बे, बम्बईचे मुंबई झाल्यानंतर मद्रासचे चेन्नई, कलकत्याचे कोलकाता, बंगलोरचे बेंगलुरू, त्रिवेंद्रम तिरुअनंतपुरम् अशी अनेक मूळची नावे सरकारमान्य झाली, सर्वत्र वापरली जाऊ लागली. त्यानंतर मी उत्तर प्रदेशचा राज्यपाल असताना माझ्या आदेशानेच 'अलाहाबाद'चे प्रयागराज आणि 'फैजाबाद' चे 'अयोध्या' झाले. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आता 'इंडिया ऐवजी आवर्जून 'भारत' म्हणताना आपण पाहतो, याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले.