भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 17:47 IST2026-01-11T17:45:22+5:302026-01-11T17:47:10+5:30
Harshawardhan Sapkal Criticize BJP: भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणते पण ते वस्तुस्थिती तशी नाही. भाजपात गुंड, मवाली, माफिया यांना आमदार, खासदार, मंत्री केले जाते, आता तर भाजपा बलात्काऱ्यांनाही पक्षात संधी देत आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
मुंबई - भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणते पण ते वस्तुस्थिती तशी नाही. भाजपात गुंड, मवाली, माफिया यांना आमदार, खासदार, मंत्री केले जाते, आता तर भाजपा बलात्काऱ्यांनाही पक्षात संधी देत आहे. बदलापूरमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपाने स्वीकृत नगरसेवक करून विकृतीचा कळस गाठला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तसेच भाजपाचा बेटी बचाव, बेटी पढाव, हा पोकळ नारा असून, खरे तर भाजपापासून बेटी बचाव असे चित्र आहे असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना रविवारी पनवेल मध्ये प्रचार केला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, उन्नाव बलात्कारातील आरोपी भाजपचा आमदार आहे, उत्तराखंड मधील अंकिता भंडारी प्रकरणातही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची नावे समोर आली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव केलेल्या महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात भाजपाच्या खासदाराचे नाव आलेले आहे आणि आता लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केलेल्या नराधमाला भाजपाने स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्त केले. भाजपाने सर्व मर्यादा, नैतिकता गुंडाळून ठेवली आहे, आसा दावा सपकाळ यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिक जनतेची मागणी काँग्रेस पक्षाने सातत्याने लावून धरली आहे. नवी मुंबई विमान तळावरून जेव्हा पहिले उड्डाण होईल त्यावेळी दि. बा. पाटील विमानतळ अशी उद्घोषणा ऐकायला येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पण अद्याप विमानळाला नाव दिलेले नाही, हा भाजपाचा कोडगेपणा आहे. देवेंद्र फडणवीस १२ तारखेला पनवेल भागात प्रचारासाठी येणार आहेत, सध्या आचारसंहिता सुरु आहे पण आचारसंहिता संपल्यानंतर दुसऱ्या दिवशीच दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला दिल्याचा निर्णय होईल, असे फडणवीस यांनी या सभेतच जाहीर करावे, असे आव्हान हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.