मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 20:08 IST2025-10-01T20:05:46+5:302025-10-01T20:08:45+5:30
Shiv Sena Shinde Group News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारधारेवर खरी शिवसेना चालत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
Shiv Sena Shinde Group News: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरून ठाकरे गट, मनसे, शिवसेना शिंदे गट, भाजपासह अन्य पक्षही जोरदार तयारीला लागले आहेत. विजय संकल्प मेळाव्याच्या माध्यमातून भाजपाने मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यातच भाजपा महायुती आणि ठाकरे गट-मनसेकडूनही महापौर पदावरून दावे केले जात आहेत. ठाकरे बंधूंची युती अधिकृतपणे जाहीर झाली नसली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे ठाकरे गटातील गळती थांबताना दिसत नाही. आता उद्धवसेनेशी संलग्न असलेल्या एका गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
ठाकरे गटाशी संलग्न असलेल्या उत्तर भारतीय एकता मंचच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. उत्तर भारतीय एकता मंचचे अध्यक्ष प्रेम विश्वकर्मा, उपाध्यक्ष सुनील गुप्ता, उपाध्यक्ष उपेश जयस्वाल, महासचिव राजकुमार यादव, सचिव दया शंकर तिवारी, कोषाध्यक्ष अरुण तिवारी तसेच संजय दुबे, राज बहादुर यादव, रवी तिवारी, अनिल उपाध्याय, पुनम जयस्वाल, बिंदू गुप्ता, कृष्णकुमार दुबे, रमेश सिंह, विश्वजीत सिंग, बाबुराव प्रजापती, हरिदास विश्वकर्मा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि मातीशी एकरूप
मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये लाखो उत्तर भारतीय राहतात. पिढ्यानपिढ्या येथे स्थायिक झाले असून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि येथील मातीशी ते एकरूप झाले आहेत. त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला असून त्यांचे मी स्वागत करतो असे याप्रसंगी नमूद केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारधारेवर खरी शिवसेना चालत आहे. मुख्यमंत्री असताना केलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन आपण शिवसेनेमध्ये दाखल झाला आहात. आता आपण सर्वजण एक परिवार म्हणून राहणार असून परस्परांना सहयोग देणार आहोत असे याप्रसंगी अधोरेखित केले.
दरम्यान, मुंबई, ठाणे, कल्याण, मीरा-भाईंदर, नालासोपारा आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय राहतात. त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे प्राधान्याने निराकरण केले जाईल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.