भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का! महापौर पदाचा पहिला उमेदवार ९ नगरसेवकांसह फुटला, काँग्रेसचे त्याला मतदान करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:46 IST2026-02-19T11:44:45+5:302026-02-19T11:46:39+5:30
Bhiwandi Mayoral Election Update 2026: भिवंडी महानगरपालिका महापौर निवडणुकीत राजकीय भूकंप. भाजपचे ९ नगरसेवक काँग्रेसच्या वाटेवर. नारायण चौधरी यांची नाराजी भाजपला महाग पडणार? वाचा सविस्तर.

भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का! महापौर पदाचा पहिला उमेदवार ९ नगरसेवकांसह फुटला, काँग्रेसचे त्याला मतदान करण्याचे आदेश
भिवंडी: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षांतर्गत वाद आणि उमेदवारी बदलाच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या ९ नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवले असून, त्यांनी काँग्रेस पुरस्कृत 'भिवंडी सेक्युलर फ्रंट'ला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे भाजपच्या हातून महापौरपदाची खुर्ची निसटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने सुरुवातीला नारायण चौधरी यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित केले होते. त्यांनी अर्ज भरल्यानंतर भाजपाने ऐनवेळी स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर करत अर्ज भरायला लावला. पक्षाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे चौधरी गट प्रचंड नाराज झाला. चौधरी यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत ८ इतर नगरसेवकांसह भाजपपासून अंतर राखले आहे.
भिवंडी महापालिकेत एकूण ९० जागा असून बहुमतासाठी ४६ मतांची गरज आहे. सध्या काँग्रेसकडे ३० जागा, राष्ट्रवादी (शरद पवार गट) १२ जागा, भाजप बंडखोर (चौधरी गट) ९ नगरसेवक असा संभाव्य आघाडीचा बहुमताचा आकडा ५१ वर जात आहे.
चौधरी गट बाजुला झाल्याने मूळ भाजपकडे आता केवळ १३ नगरसेवक उरले आहेत. भाजपचे एकूण २२ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेना (शिंदे गट) आणि इतर छोट्या आघाड्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असली, तरी अंकगणित पाहता काँग्रेसचा विजय सुकर होताना दिसत आहे. २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत आता संपूर्ण राज्याचे लक्ष भिवंडीच्या निकालाकडे लागले आहे.
'काँग्रेस'चा भाजप उमेदवाराला पाठिंबा
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत एकापाठोपाठ एक धक्कादायक वळणे येत आहेत. महायुतीमध्ये उभी फूट पडली असतानाच, आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या नगरसेवकांसाठी एक खळबळजनक 'व्हीप' जारी केला आहे. महापौरपदासाठी भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना मतदान करण्याचे आदेश काँग्रेसने दिले असून, उपमहापौरपदासाठी काँग्रेसचेच तारीक मोमीन निवडणुकीच्या रिंगणात असतील.
या निर्णयामुळे भिवंडीत एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जिथे मूळ भाजप स्नेहा पाटील यांच्या पाठीशी आहे, तिथे काँग्रेस चक्क भाजपच्याच एका बंडखोर गटाला साथ देऊन सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे.
महायुतीत बिघाडी
दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील दरीही वाढली आहे. शिवसेनेचे गटनेते मनोज काटेकर यांनी भाजपवर टीका करत, "भाजपचे उमेदवार पळून गेले आहेत, त्याचे खापर आमच्यावर का फोडता?" असा सवाल केला आहे. यामुळे महायुतीतील घटक पक्षच एकमेकांसमोर ठाकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.