...म्हणून मी सभागृहात गैरहजर राहिलो; धनंजय मुंडेंचा खुलासा, वाल्मिक कराडवरही बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 20:44 IST2024-12-20T20:40:15+5:302024-12-20T20:44:20+5:30

हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे," असं धनंजय मुंडेंनी सांगितलं.

beed sarpanch murder case ncp Dhananjay Munde reaction on absent from the House and Valmik karad | ...म्हणून मी सभागृहात गैरहजर राहिलो; धनंजय मुंडेंचा खुलासा, वाल्मिक कराडवरही बोलले!

...म्हणून मी सभागृहात गैरहजर राहिलो; धनंजय मुंडेंचा खुलासा, वाल्मिक कराडवरही बोलले!

Dhananjay Munde ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळच्या व्यक्तींचा हात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून अधिवेशनातून गायब असलेले धनंजय मुंडे आज सायंकाळी अखेर माध्यमांसमोर आले आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "माझ्या सहकाऱ्याबाबत काही आरोप झाले असतील आणि त्या प्रकरणी जर मुख्यमंत्री सभागृहात निवदेन देणार असतील तर अशावेळी प्रथा परंपरांनुसार मी आज सभागृहात उपस्थित राहिलो नाही," असं स्पष्टीकरण मुंडे यांनी दिलं आहे.

देशमुख हत्या प्रकरणात आपली भूमिका मांडताना धनंजय मुंडे म्हणाले की, "मी सुरुवातीपासून सांगतोय की हे प्रकरण व्यवहारातून झालं आहे. संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेचं समर्थन कोणीही करू शकत नाही. या प्रकरणात जवळपास सर्वच आरोपींना अटक झाली आहे. आता एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत तपास होणार असून या घटनेचं सत्य समोर येणार आहे. हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी माझी मागणी आहे," असं त्यांनी सांगितलं.

वाल्मिक कराडविषयी काय म्हणाले मुंडे?

केज तालुक्यातील पवनचक्की कंपनीला २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असताना कराड हा नागपुरातच असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. यावर बोलताना धनंजय मुंडेंनी म्हटलं की, "दानवे यांनी वाल्मिक कराड हे नागपुरात नक्की कुठे आहेत, हे सांगितलं असतं तर पोलिसांना कराड यांना अटक केली असती."

गैरहजेरीवरून सुरेश धस यांनी साधला होता निशाणा

"हत्या प्रकरणातील आरोपींचे जे आका आहेत ते धनंजय मुंडे यांचे शागिर्द आहेत. धनंजय मुंडेंच्या शागिर्दावर (वाल्मिक कराड) एवढे सगळे आरोप होत असताना धनंजय मुंडे हे कुठे लपून बसले आहेत ते माहीत नाही. मुंडे यांनी समाजासमोर यायला हवं. त्यांच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली असली तरी त्यांनी समाजासमोर यायला हवं," अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी आज दुपारी केली होती.

Web Title: beed sarpanch murder case ncp Dhananjay Munde reaction on absent from the House and Valmik karad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.