Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:58 IST2025-10-09T18:56:35+5:302025-10-09T18:58:00+5:30
Arnala Crime: अर्नाळा येथील एकाच कुटुंबातील तिघांवर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली.

Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
अर्नाळा येथील एकाच कुटुंबातील तिघांवर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी तब्बल ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केल्याची माहिती गुन्हे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली आहे.
विरारच्या अर्नाळा बंदरपाडा गावात प्राध्यापक गोवारी कुटंबिय राहतात. प्रा. गोवारी हे अर्थव नावाचे क्लास चालवतात. ते कामानिमित्ताने आगाशी गावात राहतात. तर अर्नाळा गावात त्यांचे वडील जगन्नाथ गोवारी (७६), आई लीला गोवारी (७२) आणि बहिण नेत्रा गोवारी (५२) राहतात. ६ ऑक्टोबरला रात्री ३ वाजण्याच्या सुमारास एका हल्लेखोराने गोवारी यांच्या घरात आला. त्याने कोयत्यासारख्या वस्तूने तिघांवर सपासप वार केले होते. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेऊन गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेश दिले होते.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देवून सुमारे ५०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासून, तांत्रिक विश्लेषण व बातमीदार यांचे मार्फतीने आरोपी दिपेश अशोक नाईक (२९) याला बुधवारी रात्री मुंबई येथून ताब्यात घेतले. त्याचेकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने ३० ते ४० लाख रुपयांचे कर्जबाजारी झाल्याने चोरीच्या उद्देशाने सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी अर्नाळा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. केले. दिपेश नाईक हा गोवारी यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर रहायला आहे. हल्ला केल्यानंतर तो काहीच घडले नाही, अशा हावभावात घरीच रहायला होता. चोरीच्या उद्देशाने तो गोवारी यांच्या घरात शिरला होता. मात्र त्यावेळी नेत्रा यांना जाग आली त्यामुळे त्यांच्यावर दिपेश ने कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर बचावासाठी आलेल्या जगन्नाथ आणि लिला यांच्यावरही हल्ला केला होता.
उपरोक्त कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, पोउनि प्रकाश तुपलोंढे, रामचंद्र पाटील, सफौ शिवाजी पाटील, पो.हवा मुकेश तटकरे, सागर बारवकर, प्रशांत पाटील, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, प्रशांत बोरकर, मसुब प्रविण वानखेडे, सागर सोनवणे आणि सायबरचे सफौ संतोष चव्हाण यांनी केली आहे.