युती-आघाडीत महाकुरघोड्या; नाशिकमध्ये ठाकरेंना डोकेदुखी, माढामध्ये मोहितेंची वेगळी चूल!

By यदू जोशी | Published: March 28, 2024 06:01 AM2024-03-28T06:01:39+5:302024-03-28T06:24:29+5:30

गडचिरोली, नाशिक, माढापासून मुंबई मतदारसंघापर्यंत कुरघोड्या सुरू असून शड्डू ठोकणाऱ्या नाराजांना आवरता औवरता नेतेमंडळींची दमछाक होताना दिसत आहे.

Alliance-fronted giant horses; Thackeray has a headache in Nashik, Mohite has a different hearth in Madha! | युती-आघाडीत महाकुरघोड्या; नाशिकमध्ये ठाकरेंना डोकेदुखी, माढामध्ये मोहितेंची वेगळी चूल!

युती-आघाडीत महाकुरघोड्या; नाशिकमध्ये ठाकरेंना डोकेदुखी, माढामध्ये मोहितेंची वेगळी चूल!

मुंबई : मोठ्या राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात करताच पक्षांतर्गत कुरघोडींमुळे महायुती व महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. गडचिरोली, नाशिक, माढापासून मुंबई मतदारसंघापर्यंत कुरघोड्या सुरू असून शड्डू ठोकणाऱ्या नाराजांना आवरता औवरता नेतेमंडळींची दमछाक होताना दिसत आहे.

नाशिकमध्ये माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारी जाहीर होताच तेथील लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी आपण निवडणूक लढणारच, असे जाहीर केले. ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप त्यांनी केला. ठाकरे यांची आपण एक-दोन दिवसात भेट घेऊ, पण निवडणूक लढविणारच, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

'तुतारी'च वाजवणार माढ्यात मोहिते पाटील,शरद पवारांचा भाजपला धक्का
भाजपने राज्यातील पहिल्याच यादीत माढा येथून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराज असलेले अकलूजचे मोहिते पाटील आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तुतारी वाजविणार, असे निश्चित झाले आहे.
धैर्यशील मोहिते पाटील 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षात प्रवेश करुन मैदानात उतरणार असल्याची माहिती जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली आहे. या माध्यमातून शरद पवार यांनी भाजपला एक धक्का दिला आहे.
भाजप नेते आ. रणजितसिंह मोहिते पाटील आणि कुटुंबीयांनी बंडखोरी करू नये, यासाठी अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर वेगवान राजकीय घडामोडी उशीरापर्यंत सुरू होत्या. आधी भाजपचे नेते आणि नंतर शरद पवार गटाचे नेते बंगल्यावर दाखल झाले होते.

सांगली आणि दक्षिण-मध्य मुंबईवरून काँग्रेसमध्ये खदखद
सांगली व दक्षिण-मध्य मुंबईत शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने तेथील काँग्रेसची नेतेमंडळी कमालीची नाराज झाली आहेत.
काँग्रेसची ही परंपरागत जागा कायम ठेऊन विशाल पाटील यांना उमेदवारी द्यावी, या मागणीसाठी आ. विश्वजित कदम यांनी पदाधिकाऱ्यांसह दिल्ली गाठली. खरगे तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक, सलमान खुर्शीद व मोहन प्रकाश यांच्या त्यांनी भेटी घेतल्या.
महाविकास आघाडीत चर्चा सुरू असताना शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर करणे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे. शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.

नाशिकमध्ये महायुतीत तणाव
नाशिकवरून शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे अडून आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा आपल्याकडेच घ्या, असा प्रचंड दबाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणला आहे. सातारच्या बदल्यात नाशिकची जागा छगन भुजबळ यांच्यासाठी सोडल्याच्या चर्चेने नवा द्वीस्ट आला आहे.

मविआत, महायुतीत धुसफूस
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकत्यांनी सातारा मतदारसंघ दुसऱ्याला सोडू नका आणि माढा मतदारसंघातील उमेदवार बदला, अशी टोकाची भूमिका घेतली.
त्याचबरोबर दोन्ही मतदारसंघातून नितीन पाटील आणि संजीवराजेंच्या उमेदवारीची एकमुखीही मागणी करण्यात आली.
उत्तर-पूर्व मुंबईची जागा शिवसेनेकडे (संजय दिना पाटील) गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या (शरद पवार) कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर निदर्शने केली.
प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाचा भाजपला अप्रत्यक्ष फायदा होईल. त्यांनी उमेदवार जाहीर केले असले तरी पुन्हा विचार करावा, अशी विनंती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Web Title: Alliance-fronted giant horses; Thackeray has a headache in Nashik, Mohite has a different hearth in Madha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.