अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:44 IST2025-12-31T13:41:18+5:302025-12-31T13:44:24+5:30
गंभीर अवस्थेत असलेल्या पठाण यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीचा ताणतणाव आणि धावपळीचा बळी एक उमेदवार ठरला आहे. मीरा रोडच्या नया नगर भागात राहणारे ६६ वर्षांचे जावेद पठाण हे मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने हैदरी चौक येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रभाग २२ मधून राष्ट्रवादी (अजित पवार)चा उमेदवारी अर्ज भरण्यास गेले होते. अर्ज भरून ते बाहेर आले असता त्यांची प्रकृती अचानक बिघडली. गंभीर अवस्थेत असलेल्या पठाण यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
भाजपने डोंबिवलीत कापले आठ माजी नगरसेवकांचे तिकीट -
डोंबिवली : भाजपने पक्षातील आठ माजी नगरसेवकांचे तिकीट कापले. त्यामध्ये प्रामुख्याने शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, प्रमिला चौधरी, विश्वदीप पवार, अर्जुन भोईर, रमाकांत पाटील आदी नगरसेवकांचे पत्ते कापले. पवार यांच्या जागी आसावरी नवरे आणि धात्रक दाम्पत्याच्या जागी मृदुला नाख्ये, समीर चिटणीस यांची वर्णी लागली. भाजपने पॅनल क्रमांक २९ मध्ये कविता म्हात्रे, अलका म्हात्रे, मंदार टावरे, आर्या नाटेकर अशा चारही जणांचे उमेदवारी अर्ज भरले असून, पुढील तीन दिवसांत त्यापैकी दोघांना अर्ज मागे घ्यावे लागतील.
नार्वेकर यांच्या नातेवाईकाच्या विरोधात बंडखोर उमेदवार -
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईक हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात मुंबई भाजपचे उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांनी प्रभाग क्रमांक २२५ मधून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ३३ वर्षे पक्षात कार्यरत असतानाही तिकीट नाकारल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना कमलाकर दळवी यांनी व्यक्त केली. दळवी यांनी उमेदवारी अर्ज भरल्याची पुष्टी केली. मात्र, अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. हर्षिता नार्वेकर यांना २२५ व २२७ या दोन्ही प्रभागांसाठी एबी फॉर्म देण्यात आल्याचे समजते. राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे?
मुंबई : मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने सोमवारी संध्याकाळी ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. त्यानंतर रात्री उशिरा आणखी ५२ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. परंतु उर्वरित २६ उमेदवारांची यादी अजून प्रसिद्ध केलेली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे हे गुलदस्त्यात आहे. काँग्रेसकडे या जागांवर उमेदवार नाही का, अशा चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, मी मुंबईबाहेर आहे. त्यामुळे याविषयी मला फारशी कल्पना नाही, असे ते म्हणाले.
रात्री प्रवेश, सकाळी तिकीट -
उल्हासनगर : शिंदेसेना व भाजपने सोमवारी रात्री तीन जणांना पक्षात प्रवेश देऊन, सकाळी तिकीट दिले. यामुळे नाराज झालेल्या पक्षातील माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. उल्हासनगर मनसेचे उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे यांना सोमवारी रात्री शिंदेसेनेने प्रवेश देऊन, सकाळी प्रभाग क्र. १३ मधून उमेदवारी घोषित केली.
राज-उद्धव मातोश्रीवर भेटले -
मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी मुदत संपल्यानंतर संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुंबई महापालिकेतील सत्ता राखण्याचे आव्हान ठाकरे बंधूंसमोर आहे. उद्धवसेनेचे १६४, तर मनसेचे ५३ उमेदवार रिंगणात आहेत. तर, राष्ट्रवादीला (शरद पवार) १० जागा सोडण्यात आल्या आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरे बंधूंनी अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवून उमेदवारांना थेट एबी फॉर्म दिले होते. तरीही मुंबईत काही ठिकाणी ठाकरे बंधूंना बंडखोरी व नाराजीला सामोरे जावे लागले आहे. आज, बुधवारपासून प्रचाराला जोर चढणार आहे. ठाकरे बंधूंच्या मुंबईत एकत्रित सात सभा होणार आहेत. तसेच, राज्यातील अन्य महापालिकेतही ते एकत्र प्रचार करतील.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजांशी साधला संवाद -
ठाणे : शिंदेसेनेकडून जाहीर झालेल्या यादीत विद्यमान १४ नगरसेवकांचे तिकीट कापण्यात आले. त्यामुळे काहींनी आपल्या पदाचे राजीनामे दिले, तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा नाराजांची समजूत काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधत नाराजांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी नाराजांना सांगितले की, शिवसेनेचा पाठिंबा हा भाजप-शिवसेना महायुतीलाच आहे. अफवा व गैरसमजांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नका. शिवसेना आणि भाजपची महायुती भक्कम असून, आम्ही एकत्रितपणे जनतेसाठी काम करीत आहोत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.