Budget 2024 : "1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळण्यासोबतच..."; धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 17:17 IST2024-02-01T17:05:17+5:302024-02-01T17:17:49+5:30
Dhananjay Munde And Budget 2024 : केंद्रीय अर्थसंकल्पावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Budget 2024 : "1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळण्यासोबतच..."; धनंजय मुंडेंनी स्पष्टच सांगितलं
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने आज सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील शेतकऱ्यांना पुरेपूर न्याय व काळानुरूप शेतीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना बाबत संतुलन साधले आहे असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
"आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी पत आराखडा 20 लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारित करण्याच्या घोषणेमुळे लाखो शेतकऱ्यांना संस्थात्मक कर्ज प्रणालीचा फायदा होऊन खासगी सावकारी पासून त्यांची सुटका होणार असून शेतीपूरक उद्योगांसाठी अधिकचे भांडवल उपलब्ध होणार आहे."
"नैसर्गिक शेतीला बळ देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आल्यामुळे 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ मिळण्यासोबतच ग्राहकांना सुद्धा विषमुक्त अन्न उपलब्ध होणार आहे. याशिवाय साठवणूक सुविधा वाढविण्यावर या अर्थसंकल्पात भर दिल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल साठवणूक करणे आणि योग्य भाव आल्यावर बाजारात विकणे शक्य होणार आहे."
"शेतीसाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची क्रांतिकारी घोषणा करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना सुयोग्य माहिती आणि साधनसामग्री सहजासहजी उपलब्ध होणार आहे. मार्केट इंटलिजन्स स्टार्ट अप सपोर्ट उपलब्ध होणार आहे. या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो" असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.