अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:07 IST2026-01-14T16:05:10+5:302026-01-14T16:07:33+5:30
काही झाले तरी मनभेद होणार नाही असं आमच्यात ठरलंय मात्र अजित पवार असे का वागत आहेत कळत नाही असं भाजपाने प्रत्युत्तर दिले.

अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र निवडणूक लढत आहे. याठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीची थेट लढत भाजपासोबत आहे. त्यामुळे भाजपा आणि अजित पवारांमधील संघर्ष वाढला आहे. अजित पवारांनी एका पत्रकार परिषदेत ज्यांनी माझ्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आज त्यांच्यासोबतच सत्तेत असल्याचं विधान करून भाजपाला टार्गेट केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता १९९९ साली आली मात्र त्याआधी सिंचन प्रकल्पाचा खर्च वाढवण्याचं काम पूर्वीच्या सरकारने केले होते. एका प्रकल्पाची किंमत २०० कोटी इतकी होती पण त्यावेळी भाजपा शिवसेना युती सरकारने पार्टी फंडासाठी १०० कोटी मागितले आणि त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही त्यात १० कोटींची वाढ करून २०० कोटींचा प्रकल्प थेट ३१० कोटींवर नेला असा आरोप अजित पवारांनी केला. विशेष म्हणजे भाजपा शिवसेना युती सरकारच्या काळात सिंचन खाते हे भाजपाकडे होते त्यामुळे अजित पवारांच्या आरोपांमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले होते की, महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ माझ्याकडे दिले होते. मी अजूनही रेकॉर्ड दाखवेन. त्यात पुरंदर सिंचन योजना ही ३३० कोटी रुपयांची झाली होती. मी आल्यावर ती योजना रद्द केली. काही अधिकाऱ्यांनी मला सांगितले, दादा यात गडबड आहे. ११० कोटी प्रकल्पात कसे वाढले हे मी विचारले. तेव्हा आम्हाला पार्टी फंड पाहिजे असं सांगण्यात आल्याचं अधिकारी म्हणाले. त्यामुळे या प्रकल्पात १०० कोटी वाढवले आणि आमच्याही अधिकाऱ्यांनी त्यात १० कोटी असे मिळून ११० कोटी खर्च वाढवण्यात आला. अजूनही ती फाईल मान्यता दिली होती ती दाखवेन. जर मी ते काढले असते तर अक्षरश: हाहाकार माजला असता. कारण त्यात सही पुरावे होते असं अजित पवारांनी सांगितले.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांना नकारात्मक चित्र दिसत असावे त्यामुळे ते अशी विधाने करत असावे. अजित पवारांकडून अशी अपेक्षा नाही. काही झाले तरी मनभेद होणार नाही असं आमच्यात ठरलंय मात्र अजित पवार असे का वागत आहेत कळत नाही. अजित पवार वरिष्ठ नेते आहेत. अजित पवार ज्याप्रकारे टीका करतायेत त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. १९९९ पासून अजित पवार गप्प का बसले? त्यावेळी तुमच्याकडे फाईल होती मग १९९९ मध्येच खुलासा करायचा होता असं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.