रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत ठिणगी? किरण सामंत यांच्या स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा… 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 04:08 PM2024-01-01T16:08:13+5:302024-01-01T16:09:34+5:30

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.

A spark in the Grand Alliance from Ratnagiri-Sindhudurg Constituency? Kiran Samant's status is discussed in political circles... | रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत ठिणगी? किरण सामंत यांच्या स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा… 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत ठिणगी? किरण सामंत यांच्या स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा… 

काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. एकीकडे एकत्र निवडणूक लढवतानाच जागावाटपात अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरू झाल्याने महायुतीमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. त्याचवेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या किरण सामंत यांनी ठेवलेल्या एका स्टेटसमुळे भाजपा आणि शिंदे गटामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर सध्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गट या दोघांकडूनही दावेदारी केली जात आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार हे विनायक राऊत असून, ते सध्या ठाकरे गटामध्ये आहेत. त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ आपल्याला सुटावा, असा शिंदेगटाचा आग्रह आहे. तर भाजपाही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे. दरम्यान, येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले शिवसेना शिदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी एक स्टेटस ठेवलं आहे. मी किरण रवींद्र सामंत... रोकेगा कौन? असं या स्टेटसवर लिहिलेलं आहे. त्यामुळे किरण सामंत यांनी हा इशारा नेमका कोणाला दिलाय, याचीही चर्चा होत आहे. 

केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा एकदा आणण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असून, त्यासाठी महाराष्ट्रातही अधिकाधिक जागा लढवण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उतरवण्याची भाजपाची योजना आहे. दरम्यान,रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्येही भाजपाकडून चाचपणी होत असून, रवींद्र चव्हाण यांना येथून उमेदवारी देण्याचा विचार भाजपाकडून करण्यात येत आहे. तसेच माजी खासदार निलेश राणे आणि ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांच्या नावांचीही भाजपाकडून चर्चा सुरू आहे. दरम्यान, वरील स्टेटस ठेवल्यानंतर किरण सामंत यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला असता आपण महायुतीकडून ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचा प्रचार करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. 

या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे दोन, भाजपाच एक, अजित पवार समर्थक एक तर ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत. त्यामुळे येथून निवडणूक लढवण्यासाठी दोन्हीकडून चुरस दिसून येत आहे. 

Web Title: A spark in the Grand Alliance from Ratnagiri-Sindhudurg Constituency? Kiran Samant's status is discussed in political circles...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.