शपथविधीला ८ आमदार अनुपस्थित; मविआच्या आमदारांनी दुसऱ्या दिवशी घेतली शपथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 06:51 IST2024-12-09T06:51:07+5:302024-12-09T06:51:37+5:30

पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी दुसऱ्या दिवशी शपथ घेतली.

8 MLAs absent from swearing-in ceremony; The MLAs of Mva took oath the next day  | शपथविधीला ८ आमदार अनुपस्थित; मविआच्या आमदारांनी दुसऱ्या दिवशी घेतली शपथ 

शपथविधीला ८ आमदार अनुपस्थित; मविआच्या आमदारांनी दुसऱ्या दिवशी घेतली शपथ 

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी आयोजित केलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात रविवारी दुसऱ्या दिवशी १०६ आमदारांनी शपथ घेतली. या आमदारांनी थोर महापुरुष, देव-देवता, संत महंतांचे स्मरण करत शपथ घेतली. पहिल्या दिवशी १७३ आमदारांनी शपथ घेतल्याने आतापर्यंत २७९ आमदार शपथबद्ध झाले आहेत, तर ८ आमदार अनुपस्थित राहिल्याने त्यांचा शपथविधी सोमवारी पार पडणार आहे. 

पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी दुसऱ्या दिवशी शपथ घेतली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली शपथ घेतली. त्यांनी शपथ घेताना हातात संविधानाचे पुस्तक घेतले होते. विजय वडेट्टीवार, अस्लम शेख, ज्योती गायकवाड यांच्यासह काँग्रेसच्या बहुतांश आमदारांनी शपथ घेताना हातात संविधानाचे पुस्तक घेतले, तर शपथेचा शेवट 'जय संविधान' या घोषणेने केला. 

उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि वंदे मातरम् म्हणत सभागृहाचे लक्ष वेधले. उद्धवसेनेच्याच सुनील प्रभू यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले, तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बिरोबाला साकडे घालत, 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं', अशी घोषणा दिली. शिंदेसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी 'जय गिरनारी' असे म्हणत शपथ घेतली. 

संस्कृत, अहिराणी, हिंदीत शपथ 
पहिल्या दिवशी सात जणांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली होती, तर 3 दुसऱ्या दिवशी मंगलप्रभात लोढा आणि सत्यजित देशमुख या दोन आमदारांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली. अनुप अगरवाल यांनी अहिराणी भाषेत तर साजीद खान यांनी हिंदी २ भाषेत शपथ घेतली. उर्वरित आमदारांनी मराठी भाषेत आपली शपथ पूर्ण केली. दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी शपथ घेताना 'नव महाराष्ट्राकडे आशेने बघणाऱ्या सर्वसामान्य जनतेला साक्षीला ठेवून' शपथ घेतली.

विक्रम पाचपुते यांचे नाव चुकले 
शपथविधी नावाच्या यादीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांचे नाव चुकले. विक्रमऐवजी विकास झाल्याची चूक हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी विधिमंडळ सचिवालयाच्या निदर्शनास आणून दिली, तसेच सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर विक्रम पाचपुते यांनी आपली शपथ पूर्ण केली.

हे आठ आमदार अनुपस्थित
उत्तमराव जानकर, विलास भुमरे, वरुण सरदेसाई, मनोज जामसुतकर, विनय कोरे, जयंत पाटील, शेखर निकम, सुनील शेळके अनुपस्थित राहिले. त्यापैकी जयंत पाटील यांनी आपण दौऱ्यावर असल्याने उपस्थित राहणार नाही, असे विधिमंडळाला कळवले होते. 
आज राज्यपालांचे अभिभाषण 
विशेष अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी ठेवले होते, तर तिसऱ्या दिवशी राज्यपाल अभिभाषण आणि विधानसभा अध्यक्षांची निवड असा कार्यक्रम आहे.

Web Title: 8 MLAs absent from swearing-in ceremony; The MLAs of Mva took oath the next day 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.