Makar Sankranti 2026: चिनी मांजा वापरणाऱ्यांची आता खैर नाही! ५ वर्षांच्या तुरुंगवासासह दंडाची तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:16 IST2026-01-13T12:15:08+5:302026-01-13T12:16:18+5:30
Chinese Manjha Ban: इंदूरमध्ये चिनी मांजामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्युच्या घटनेनंतर प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. आता पतंग उडवताना चिनी धाग्याचा वापर करणे तुम्हाला महागात पडू शकते!

Makar Sankranti 2026: चिनी मांजा वापरणाऱ्यांची आता खैर नाही! ५ वर्षांच्या तुरुंगवासासह दंडाची तरतूद
मकर संक्रांतीच्या काळात पतंगबाजीचा उत्साह शिगेला असतानाच, जीवघेण्या चिनी मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी इंदूर प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. इंदूरचे जिल्हाधिकारी शिवम वर्मा यांनी चिनी मांजाच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
इंदूरमध्ये चिनी मांजामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. या मांजामुळे केवळ मानवांनाच नाही, तर निष्पाप पक्ष्यांनाही गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांची गंभीर दखल घेत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
५ वर्षांच्या तुरुंगवासासह दंडाची तरतूद
भारतीय नागरी संरक्षण संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये जिल्ह्यात चिनी धाग्याच्या साठवणुकीवर आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जर चिनी मांजाच्या वापरामुळे कोणाचा मृत्यू झाला किंवा कुणाला गंभीर दुखापत झाली, तर संबंधित व्यक्तीवर कलम १०६(१) नुसार कारवाई केली जाईल. यामध्ये ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे.
प्रशासनाचा नागरिकांना कडक इशारा
अनेकदा लोक लपून-छपून चिनी मांजा वापरतात आणि पकडले जाणार नाही अशा भ्रमात असतात. मात्र, आता अशा प्रकरणांत अधिक सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना किंवा आयोजकांवर केवळ कलम १०६(१) नाही, तर कलम २२३ अंतर्गतही खटला चालवला जाऊ शकतो. नागरिकांनी सण साजरा करताना सुरक्षित धाग्याचा वापर करावा आणि चिनी मांजा टाळून इतरांचे प्राण वाचवावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.