"त्यांना बोलायचं होतं की,...", रवींद्र चव्हाणांची चूक मुख्यमंत्री फडणवीसांनी सुधारली; लातुरमधील सभेत काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:32 IST2026-01-07T16:29:56+5:302026-01-07T16:32:00+5:30
विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्याशिवाय राहणार नाही, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले होते. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातुरमधील सभेत भूमिका मांडली.

"त्यांना बोलायचं होतं की,...", रवींद्र चव्हाणांची चूक मुख्यमंत्री फडणवीसांनी सुधारली; लातुरमधील सभेत काय बोलले?
लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल विधान केले. त्यांच्या विधानानंतर भाजपावर टीका झाली. रवींद्र चव्हाणांनी देशमुख कुटुंबीयांची माफी मागितली. पण, ऐन निवडणुकीत चव्हाणांनी विधान करून केलेली चूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुधारली. मुख्यमंत्री फडणवीसांनी लातूरमधील सभेत या विधानावर सविस्तर भूमिका मांडली.
लातूर महापालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली. रवींद्र चव्हाण यांच्या विधानावरून वादंग उठलेले असतानाच फडणवीसांची ही सभा झाली. या सभेतून फडणवीसांनी वादावर पडदा टाकला.
लातूरच्या भूमीने महाराष्ट्राला नेतृत्व दिले -फडणवीस
लातुरच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "लातूर ही एक अशी भूमि आहे की, जिने महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणावर नेतृत्व दिले. चाकूरकर साहेबांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात नगराध्यक्षपदापासून ते लोकसभा अध्यक्ष, देशाचा गृहमंत्री असा प्रवेश केला."
"राजकारणात अशा प्रकारचे लोक आपल्याला विरळ दिसतात. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातुरला एक वेगळी ओळख असतील, ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील. खऱ्या अर्थाने विलासराव देशमुख हे असे नाव आहे, जे पक्षाच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. म्हणून आपण त्यांचा आदर करतो. हे सांगताना माझ्या मनात कोणताही संकोच नाही", असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रवींद्र चव्हाणांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले
"दोन दिवसांपूर्वी याठिकाणी काही संभ्रम निर्माण झाला, गोंधळ झाला. आमचे अध्यक्ष याठिकाणी आले होते. त्यांना बोलायचं होतं, राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे. पण, कदाचित त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असतील. त्याबाबत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे", असे भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाण यांच्या विधानावर केले.
फडणवीस पुढे म्हणाले की, "मी जाहीरपणे सांगतो, आमची लढाई काँग्रेस पक्षाशी असली, तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. ते या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते होते", असे म्हणत फडणवीसांनी झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.